Gujarat Titans vs Chennai Super Kings: इंडियन प्रीमियर लीग 2023 म्हणजेच आयपीएल 2023 स्पर्धेचा श्रीगणेशा 31 मार्चला म्हणजेच आज होणार आहे. या स्पर्धेला गतविजेच्या गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघातील सामन्याने सुरुवात होईल.
हा सामना गुजरातच्या घरच्या मैदानावर म्हणजेच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियवर भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. आयपीएलच्या 16 व्या हंगामातील हा पहिलाच सामना असल्याने सर्वांनाच याची उत्सुकता आहे. अशात दोन्ही संघ आपल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरण्याच्या प्रयत्नात असतील. तर पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते, याबद्दल आढावा घेऊ.
सीएसकेचे नेतृत्व यंदा देखील एमएस धोनीच करताना दिसणार आहे. दरम्यान, त्याला दुखापत असल्याचे समोर आले होत्, पण सीएसकेच्या सीईओने तो पूर्ण तंदुरुस्त असल्याचे सांगत या चर्चांना पूर्ण विराम दिला. दरम्यान, सीएसकेकडून गेल्यावर्षीप्रमाणेच डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड सलामीला फलंदाजीला उतरू शकतात.
तसेच मधल्या फळीत मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, एमएस धोनी असू शकतात. त्याचबरोबर खालची फळी सांभाळण्यासाठी संघाकडे शिवम दुबे, रविंद्र जडेजासारखे अष्टपैलू देखील आहेत. तसेच स्टोक्स आणि अली देखील गोलंदाजीत योगदान देतील.
मिचेल सँटेनरलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. त्याच्या संघात असण्याने फिरकी गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही खाली सखोलता मिळेल. याशिवाय वेगवान गोलंदाज दीपक चाहर आणि तुषार देशपांडे यांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.
गुजरात टायटन्सबद्दल सांगायचे झाल्यास शुभमन गिल आणि केन विलियम्सन सलामीला फलंदाजीला उतरू शकतात. याशिवाय मधल्या फळीत मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहासह कर्णधार हार्दिक पंड्याही असू शकतो.
त्याचबरोबर राहुल तेवतिया हा अष्टपैलू खेळाडू संघाला समतोल साधून देऊ शकतो. राशिद खानही गोलंदाजीबरोबरच फलंदाजीत खालच्या फळीत चांगले योगदान देण्याची क्षमता ठेवतो. तसेच तो संघाच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक असेल.
याशिवाय मोहम्मद शमी गुजरातच्या गोलंदाजी फळीतील महत्त्वाचा खेळाडू असेल. त्याचबरोबर शिवम मावी, आर साई किशोर आणि अल्झारी जोसेफ यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.
चेन्नई सुपर किंग्सची संभावित प्लेइंग इलेव्हन - ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, अंबाती रायुडू, बेन स्टोक्स, शिवम दुबे, एमएस धोनी, रविंद्र जडेजा, मिचेल सँटनर, दीपक चाहर, तुषार देशपांडे.
गुजरात टायटन्सची संभावित प्लेइंग इलेव्हन - शुभमन गिल, केन विलियम्सन, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, हार्दिक पंड्या, राहुल तेवातिया, राशिद खान, शिवम मावी, आर साई किशोर, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.