KL Rahul ruled out from IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू झालेला असातानाच लखनऊ सुपर जायंट्सला जबरदस्त धक्का बसला आहे. त्यांचे दोन प्रमुख खेळाडू गंभीर दुखापतग्रस्त झाले आहे. यात कर्णधार केएल राहुल आणि जयदेव उनाडकट यांचा समावेश आहे.
केएल राहुल आणि जयदेव उनाडकट त्यांना झालेल्या दुखापतींमुळे उर्वरित आयपीएल हंगामातून बाहेर झाले असल्याची माहिती समोर आली आहे. केएल राहुलला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध 1 मे रोजी झालेल्या सामन्यात दुखापत झाली आहे.
या सामन्याच्या दुसऱ्या षटकात फाफ डू प्लेसिसने सुरेख कव्हर ड्राईव्हचा फटका मारला होता, ज्यावर बेंगलोरला चौकारही मिळाला. पण हा चौकार अडवण्यासाठी धावत असताना केएल राहुलचा उजव्या पायात अचानक वेदना झाल्या होत्या त्यानंतर तो मैदानातून बाहेरही गेला. त्याच्याऐवजी कृणाल पंड्याने नेतृत्व केले होते. केएल राहुल फलंदाजीलाही 11 व्या क्रमांकावर उतरला होता. तसेच त्याला एकही धाव करता आली नव्हती.
आता त्याला हिप फ्लेक्सरची दुखापत झाली असल्याचे समजले आहे. त्यामुळे त्याला आता आयपीएल 2023 मधून बाहेर पडावे लागणार आहे. त्याच्याऐवजी कृणाल पंड्या किंवा क्विंटन डी कॉक यांच्यापैकी एकाकडे लखनऊ कर्णधारपद सोपवू शकतात.
तसेच रविवारी (30 एप्रिल) जयदेव उनाडकट नेटमध्ये सराव करत असताना त्याला खांद्याची दुखापत झाली आहे. त्यामुळे तो देखील उर्वरित आयपीएल 2023 साठी उपलब्ध राहू शकणार नाही.
याबद्दल बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सुत्राने पीटीआयला माहिती दिली आहे की 'केएल राहुल सध्या लखनऊ संघाबरोबर आहे, पण तो बुधवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा सामना पाहिल्यानंतर गुरुवारी संघाचा निरोप घेईल. त्याचे स्कॅन मुंबईमध्ये बीसीसीआयच्या नियुक्त केलेल्या वैद्यकीय सुविधेअंतर्गत केले जातील. त्याची आणि जयदेव यांच्या दुखापती बीसीसीआय सांभाळेल.'
'जेव्हा एखाद्याला अशाप्रकारे दुखापती होतात, त्यावेळी त्याजागी वेदना होत असतात आणि सुज देखील असते. सुज ओसरायला किमान 24 ते 48 तास लागतात. त्यानंतरच तुम्ही त्याचे स्कॅन करू शकता. केएल राहुल कसोटी संघाचा महत्त्वाचा सदस्य असल्याने, त्याने आयपीएलमध्ये भाग न घेणेच योग्य ठरेल.'
तसेच सुत्राने पुढे सांगितले की 'एकदा स्कॅनमध्ये दुखापतीचे प्रमाण निश्चित झाले की बीसीसीआयचे वैद्यकीय पथक पुढील उपचाराचा मार्ग ठरवू शकतील.' तसेच उनाडकटबद्दल सांगितले की 'ही चांगली गोष्ट आहे की जयदेवला खांदा निखळलेला नाही, पण त्याचा खांदा चांगल्या स्थितीतही नाही. त्यामुळे तो आयपीएल सध्या खेळू शकत नाही. तसेच तो कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठीही तंदुरुस्त होईल की नाही, हे सांगू शकत नाही.'
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की केएल राहुल आणि जयदेव या दोघांचीही ७ जूनपासून सुरु होणाऱ्या कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात निवड झालेली आहे. पण आता त्यांच्या दुखापती पाहाता या अंतिम सामन्यातील त्यांच्या सहभागावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.