Kevin Pietersen bats for Shubman Gill who failing to score big runs recently:
भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणममध्ये शुक्रवारपासून (2 फेब्रुवारी) सुरू झाला आहे.
दरम्यान, या सामन्याच्या पहिल्या डावातही भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल चांगल्या सुरुवातीनंतर 34 धावांवर बाद झाला. त्यानंतर त्याच्यावर अनेकांनी टीका केली आहे.
भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही म्हटले की युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे, कारण चेतेश्वर पुजारा देखील संधीची वाट पाहात आहे.
असे असताना मात्र इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने गिलला पाठिंबा दिला आहे. यावेळी त्याने जॅक कॅलिसचेही उदाहरण दिले.
विशाखापट्टणम कसोटीत गिलला पहिल्या दिवशी जेम्स अँडरसनने बाद केले. त्यानंतर गिलच्या कामगिरीवर टीकेला सुरुवात झाली. कारण गिलने पहिल्या सामन्यातही फारशी चांगली कामगिरी केली नव्हती.
त्याने पहिल्या डावात 23 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात तो शुन्यावरच बाद झाला होता. त्याला गेल्या 10 डावातही 50 धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. त्यामुळे सध्या तो टीकेचा धनी ठरत आहे.
दरम्यान, असे असले तरी पीटरसनने म्हटले आहे की त्याला वेळ द्या. पीटरसनने ट्वीट केले की कॅलिसने पहिल्या 10 सामन्यांमध्ये 22 च्या सरासरीनेच धावा केल्या होत्या. पण नंतर तो क्रिकेटमधील दिग्गद खेळाडू झाला. शुभमन गिलला स्वत:ला शोधण्यासाठी थोडा वेळ द्या. तो खरंच चांगला खेळाडू आहे.'
गिलने 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताकडून कसोटीत पदार्पण केले होते. त्यावेळी त्याने सुरुवातीला शानदार खेळ केला होता. त्या दौऱ्यात भारताला मालिका जिंकून देण्यातही त्याने महत्त्वाचा वाटा उचलला होता. मात्र गेल्या काही महिन्यात त्याची कामगिरी खालावली आहे.
गिलने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत भारतासाठी 22 कसोटीतील 40 डावात 29.64 च्या सरासरीने 1097 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 2 शतकांचा आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.