ENG vs AUS, Ashes 1st Test: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ऍशेस मालिका सुरु झाली आहे. इंग्लंडमधील एजबॅस्टन येथे 16 जूनपासून पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे.
या सामन्यात खेळणारा एक फलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत आहे, त्यामुळे सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रमही मोडीत निघण्याची शक्यता आहे. मात्र, सचिनचा हा मोठा विक्रम मोडणे सोपे काम नाही, पण सध्या जर कोणी फलंदाज तो करु शकत असेल तर तो हा इंग्लंडचा फलंदाज आहे. चला तर त्याच्याबद्दल जाणून घेऊया...
टीम इंडियासाठी जवळपास 25 वर्षे क्रिकेट खेळणारा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर असे अनेक विक्रम आहेत, ज्याचा विचार करणेही कठीण आहे. तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये इतक्या धावा केल्या की, त्याच्या नावावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम झाला.
सचिनच्या नावावर कसोटीत 15921 धावांचा विश्वविक्रम आहे. त्याचा हा विक्रम मोडण्याच्या जवळपासही अद्याप कोणीही पोहचू शकलेले नाही. अशा परिस्थितीत इंग्लंडचा कर्णधार आणि स्टार फलंदाज जो रुट या दिशेने वेगाने पुढे जात आहे.
येत्या काही वर्षांपर्यंत तो ज्या फॉर्ममध्ये फलंदाजी करत आहे, तो असाच सुरु ठेवला तर तो एक मोठा विक्रम मोडू शकतो.
दरम्यान, जो रुटने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) ऍशेस कसोटीच्या पहिल्या दिवशी शतक झळकावले. त्याने 152 चेंडूत 118 धावांची नाबाद खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 7 चौकार आणि 4 षटकार आले.
रुट गेल्या काही काळापासून ज्या फॉर्ममध्ये आहे, ते पाहता येत्या काही वर्षांत तो सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम मोडीत काढेल, असे दिसते. रुटने कसोटी क्रिकेटमध्ये 11122 धावा केल्या आहेत. मात्र, हा मोठा विक्रम मोडण्यासाठी त्याला 3-4 वर्षे याच फॉर्ममध्ये राहावे लागणार आहे.
एजबॅस्टन येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या ऍशेस कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, इंग्लंडने पहिल्याच दिवशी फलंदाजी करताना 393 धावा करुन डाव घोषित केला. जो रुटने नाबाद 118 धावांची खेळी केली.
याशिवाय सलामीवीर जॅक क्रॉलीने 61 तर जॉनी बेअरस्टोने 78 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत विकेट न गमावता 14 धावा केल्या होत्या. सलामीवीर उस्मान ख्वाजा (4) आणि डेव्हिड वॉर्नर (8) क्रीजवर आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.