पणजी : जमशेदपूर एफसीने आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत लीग विनर्स शिल्ड धडाक्यात पटकावली, मात्र आता करंडकाच्या अंतिम लढतीसाठी त्यांचे भवितव्य दोलानमय आहे. उपांत्य फेरीतील दुसऱ्या टप्प्यात त्यांना केरळा ब्लास्टर्सविरुद्ध विजय हवाच, तसेच -१ गोलसरासरीही भरून काढावी लागेल. (Jamshedpur FC must win against Kerala Blasters)
केरळा ब्लास्टर्स व जमशेदपूर यांच्यातील दुसऱ्या टप्प्यातील उपांत्य लढत मंगळवारी (ता. १५) वास्को येथील टिळक मैदानावर होईल. पहिल्या टप्प्यात गेल्या शुक्रवारी केरळा ब्लास्टर्सने सहल अब्दुल समद याच्या गोलच्या बळावर विजय नोंदवून अर्धी मोहीम फत्ते केली.
जमशेदपूरचा विजयी दृष्टिकोन
आयएसएल (ISL) साखळी फेरीत सलग सात सामने जिंकण्याचा विक्रम करणाऱ्या ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील जमशेदपूरला केरला ब्लास्टर्सविरुद्ध सूर गवसला नाही. "आम्ही आमचा दृष्टिकोन बदणार नाही. प्रत्येक सामना जिंकणे हेच आमचे ध्येय असते. अंतिम फेरी गाठण्यासाठी आम्हाला पुढील सामना जिंकावाच लागेल, त्यासाठी आम्हाला गोल करावे लागतील. शिल्ड जिंकताना आम्ही एटीके मोहन बागानविरुद्ध (ATK Mohan Bagan) राखलेला दृष्टिकोनच कायम असेल. आम्ही प्रतिस्पर्ध्यांचा आदर करतो आणि ते तुल्यबळ असल्याचे आम्हाला माहीत आहे. सर्वोत्तम कामगिरीसाठीच आमचे प्रयत्न असतील. आमची विजयी आगेकूच खंडित झाल्यामुळे वेदना झालेल्या आहेत, आता अंतिम फेरीच हेच ध्येय आहे," असे कॉयल यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले.
केरळाची पुन्हा शून्यातून सुरवात
"आम्ही मागच्या सामन्याकडे न पाहण्याचे ठरविले आहे. त्या निकालावर आम्ही निश्चिंत राहू शकत नाही. उद्याचा सामना पूर्णतः नवा आहे, त्यावर आम्हाला लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यामुळे मागील १-० निकालातून फार काही साध्य होणार नाही. आम्ही शून्यातून ०-० अशी सुरवात करू. मागील सामन्यापेक्षा ही लढत जास्त खडतर असेल," असे केरळा ब्लास्टर्सचे (Kerala Blasters) मार्गदर्शक इव्हान व्हुकोमानोविच यांनी सांगितले. जमशेदपूरचा (Jamshedpur) मध्यरक्षक सहल अब्दुल समद याने मोसमात शानदार खेळ करताना सहा गोल नोंदविले आहे. संघातील परदेशी खेळाडूंसह तोही प्रमुख आधारस्तंभ आहे.
मोसमात आमने-सामने
- साखळी फेरी : २६ डिसेंबर २०२१ रोजी १-१ गोलबरोबरी
- साखळी फेरी : १० फेब्रुवारी २०२२ रोजी जमशेदपूर ३-० फरकाने विजयी
- उपांत्य फेरी (पहिला टप्पा) : ११ मार्च २०२२ रोजी केरळा ब्लास्टर्सचा १-० फरकाने विजय
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.