पणजी : खराब सुरवातीनंतर एफसी गोवा संघ आता इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (ISL football) मोसमाच्या आठव्या मोसमात सावरत आहे. मागील दोन्ही लढती जिंकल्यानंतर फॉर्ममधील हैदराबाद एफसीविरुद्ध खेळावर नियंत्रण राखण्याच्या नियोजनावर भर असल्याचे एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
एफसी गोवा आणि हैदराबाद यांच्यातील सामना शनिवारी (ता. 18) बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर होईल. जमशेदपूरविरुद्धच्या बरोबरीनंतर हैदराबादने बंगळूर व नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्धचे सामने जिंकून मुसंडी मारली. एफसी गोवाविरुद्ध विजय नोंदवून पहिल्या चार संघांत स्थान मिळविण्यासाठी प्रशिक्षक मानोलो मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघ प्रयत्नशील असेल. एफसी गोवाने भरपाई वेळेतील गोलमुळे नॉर्थईस्टकडून निसटता पराभव पत्करल्यानंतर अनुक्रमे ईस्ट बंगाल व बंगळूरला हरविले. हीच विजयी मालिका राखून गुणतक्त्यातील स्थान सुधारण्याची संधी माजी उपविजेत्यांना असेल. हैदराबादचे सध्या दहा, तर एफसी गोवाचे सहा गुण आहेत.
नव्वद मिनिटांचा खेळ महत्त्वाचा
‘‘माझ्या संघाने शनिवारच्या लढतीवर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. खेळाडूही सज्ज आहे. संपूर्ण नव्वद मिनिटांचा खेळ महत्त्वपूर्ण असेल. हैदराबाद संघ मातब्बर असून त्यांच्या संघाने अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला समतोल साधला आहे, साहजिकच लढत कठीण असेल. आमच्या संघाने यापूर्वी जास्त गोल स्वीकारलेत याला मी महत्त्व देत नाही. सामन्यावर नियंत्रण राखणे जास्त महत्त्वाचे आहे, विशेषतः आम्हाला सेटपिसेसवर एकाग्रता साधावी लागेल,’’ असे चाळीस वर्षीय फेरांडो सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणाले.
ओर्तिझला मुकणार
एफसी गोवाचा (goa) स्पॅनिश आघाडीपटू होर्गे ओर्तिझ हैदराबादविरुद्ध रेड कार्ड निलंबनामुळे खेळू शकणार नाही. त्याला बंगळूरविरुद्ध थेट रेड कार्ड मिळाले होते, त्यामुळे त्याला अखिल भारतीय फुटबॉल (football) महासंघाच्या शिस्तपालन समितीनेही कारणे दाखवा नोटीस बजावली होती. शनिवारच्या लढतीत ओर्तिझची अनुपस्थिती जाणवणार नाही असे फेरांडो यांनी नमूद केले. स्पॅनिश आघाडीपटू ऐराम काब्रेरा मागील काही सामने तंदुरुस्तीअभावी खेळू शकला नव्हता, बंगळूरविरुद्ध तो बेंचवर होता. ओर्तिझच्या अनुपस्थितीत काब्रेरा हैदराबादविरुद्ध खेळण्याचे संकेत फेरांडो यांनी दिले.
‘‘एफसी गोवा एक चांगला संघ आहे. त्यांची खेळाची शैली अव्वल स्थानावरील मुंबई सिटी एफसीशी मिळतीजुळती आहे. तुल्यबळ संघ असल्याने तीन गुण मिळवणे दोन्ही संघांना तितके सोपे नाही. मात्र, शनिवारी आम्ही एफसी गोवाविरुद्ध पूर्ण क्षमता आणि ताकदीनिशी खेळू.’’ अस मत हैदराबाद टीमचे प्रशिक्षक (instructor) मानोलो मार्किझ यांनी व्यक्त केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.