Punjab Kings Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: पंजाबचा राजस्थानवर शेवटच्या ओव्हरमध्ये रोमांचक विजय! हेटमायर-जुरेलचे प्रयत्न व्यर्थ

आयपीएल 2023 मधील आठव्या सामन्यात पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध रोमांचक विजय मिळवला.

Pranali Kodre

Rajasthan Royals vs Punjab Kings: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील आठवा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर पार पडलेल्या पहिल्याच आयपीएल सामन्यात पंजाब किंग्सने 5 धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी राजस्थान समोर 198 धावांचे विजयासाठी आव्हान ठेवले होते. पण राजस्थानला 20 षटकात 7 बाद 192 धावा करता आल्या. राजस्थानकडून शिमरॉन हेटमायर आणि ध्रुव जुरेलने अखेरच्या षटकांमध्ये ताबडतोड फलंदाजी करत विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना राजस्थानला विजयापर्यंत पोहचवण्यात अपयश आले.

राजस्थानकडून या सामन्यात सलामीला यशस्वी जयस्वालसह आर अश्विन उतरला होता. पण त्यांची जोडी फार काळ टिकू शकली नाही. दुसऱ्याच षटकात जयस्वालला 11 धावांवर आर्शदीप सिंगने माघारी धाडले. तर आर अश्विन चार चेंडूत शुन्य धावा करत चौथ्या षटकात आर्शदीपचाच सामना करताना बाद झाला.

पण त्यानंतर जोस बटलर आणि संजू सॅमसनने डाव सांभाळण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, बटलरचा एक झेल हरप्रीत ब्रारकडून सुटला होता. पण, हा झेल पंजाबला महागात पडला नाही, कारण बटलर 11 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. त्याला नॅथन एलिसने आपल्याच चेंडूवर झेल घेत बाद केले. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनला साथ देण्यासाठी देवदत्त पडिक्कल आला होता. मात्र पडिक्कलचे फटके आज अचूक बसत नव्हते.

याच दरम्यान, खेळपट्टीवर स्थिरावलेल्या सॅमसनला एलिसनेच 42 धावांवर माघारी धाडले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या लोकल बॉय रियान परागने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, पण तोही 15 व्या षटकात एलिसविरुद्ध खेळतानाच 20 धावा करून बाद झाला. याच षटकात एलिसने 26 चेंडूत 21 धावा करणाऱ्या पडिक्कललाही बाद केले.

पण त्यानंतर हेटमायर आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळायला आलेल्या जुरेल यांची जोडी जमली. त्यांनी आक्रमक फलंदाजी केली. 17 व्या षटकापासून त्यांनी आक्रमण सुरू केले होते. 17 व्या षटकात 16 धावा, 18 व्या षटकात 19 धावा आणि 19 व्या षटकात 18 धावा त्यांनी मिळून फटकावल्या. त्यामुळे सामना त्यांनी रोमांचक स्थितीत आणला होता.

अखेरच्या षटकात राजस्थानला 16 धावांची गरज होती. हे षटक टाकण्यासाठी पंजाबकडून सॅम करन आला. त्याने पहिल्या दोन चेंडूंवर तीनच धावा दिल्या. तिसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव घेताना हेटमायर बाद झाला. त्याने 18 चेंडूत 36 धावांची खेळी केली. हेटमायर बाद झाल्याने त्याची आणि जुरेलची 7 व्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी तुटली. ही भागीदारी त्यांनी केवळ 26 चेंडूत केली होती.

दरम्यान, हेटमायर बाद झाल्यानंतर जेसन होल्डर फलंदाजीला आला होता. पण चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर करनने केवळ दोन धावाच दिल्या. अखेरच्या चेंडूवर जुरेलने चौकार मारला, पण तोपर्यंत पंजाबने विजय निश्चित केला होता. अखेरीस जुरेल 15 चेंडूत 32 धावा करून नाबाद राहिला.

पंजाबकडून नॅथल एलिसने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच अर्शदीप सिंगने २ विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. पण पंजाबने दमदार सुरुवात केली. सलामीला उतरलेल्या प्रभसिमरन सिंगने एका बाजूने आक्रमण केले असलाना त्याला दुसऱ्या बाजूने कर्णधार शिखर धवनने चांगली साथ दिली. प्रभसिमरनच्या आक्रमणामुळे 10 षटकातच पंजाबने 90 धावांचा आकडा पार केला होता.

पण 10व्याच षटकात प्रभसिमरनला जेसन होल्डरने बाद केले. प्रभसिमरन 34 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 60 धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यानंतर शिखरने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.

पण 11 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शिखरने एक जोरदार फटका मारला पण तो चेंडू नॉन स्ट्रायकवर असलेला त्याचाच संघसहकारी भानुका राजपक्षेच्या हाताला लागला. त्यामुळे केवळ 1 धावेवर नाबाद असताना राजपक्षेला रिटायर्ड हर्ट होत मैदानातून बाहेर जावे लागले.

त्यानंतर फलंदाजीला आलेल्या यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माने शिखरला चांगली साथ दिली. या दोघांमध्ये 66 धावांची भागीदारीही झाली. या भागीदारीदरम्यान शिखरने आयपीएलमधील 48 वे अर्धशतक पूर्ण केले. पण त्यांची भागीदारी 16 व्या षटकात युजवेंद्र चहलने तोडली. त्याने जितेशला 27 धावांवर बाद केले. त्यानंतर फलंदाजीला आलेला सिकंदर रझाही एकच धाव करून बाद झाला.

पण शिखरने आक्रमक पवित्रा स्विकारत चांगली फटकेबाजी केली. यादरम्यान शाहरूख खान 11 धावांचे योगदान देऊन बाद झाला. पण शिखरने अखेरपर्यंत नाबाद राहात पंजाबला 20 षटकात 4 बाद 197 धावांपर्यंत पोहोचवले. शिखर 56 चेंडूत 86 धावा करून नाबाद राहिला. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 3 षटकार मारले.

राजस्थानकडून जेसन होल्डरने 2 विकेट्स घेतल्या, तसेच आर अश्विन आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: ‘घर नाही, पैसा नाही तरीही त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य माणुसकी शिकवणारं’

Health Tips: स्वतःकडे बरंच दुर्लक्ष होतंय, वेळ मिळत नाहीये; नेमकं करावं तरी काय?

Cash For Job Scam: अमेरिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखोंना गंडा; मडगावात दोन भामट्यांविरोधात तक्रार दाखल!

Goa CM Meet Fadanvis: मुख्यमंत्री सावंतांनी गळाभेट घेऊन फडणवीसांना दिल्या विजयाच्या शुभेच्छा

IFFI Goa 2024: चित्रपट महोत्सवाला तुडुंब गर्दी; मात्र फोंड्याच्या ‘मूव्ही मॅजिकला’ अजूनही प्रेक्षक मिळेना

SCROLL FOR NEXT