R Ashwin Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: आर अश्विनला CSK vs RR मॅचनंतरचं 'ते' व्यक्तव्य भोवलं? झाली मोठी कारवाई

Pranali Kodre

R Ashwin has been fined 25 Percent of his match-fee: राजस्थान रॉयल्सचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याच्यावर गुरुवारी इंडियन प्रीमियर लीगकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याने बुधवारी चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर आयपीएलच्या आचार संहितेतील नियमांचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

आयपीएलच्या प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार 'राजस्थान रॉयल्सचा आर अश्विनवर सामनाशुक्लाच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या आयपीएल 2023 मधील 17 व्या सामन्यादरम्यान आयपीएलच्या आचार संहितेचे उल्लंघन केले आहे.'

'अश्विनने आयपीएलच्या आचार संहितेतील कलम 2.7 अंतर्गत लेव्हल 1 चा गुन्हा मान्य केला आहे. लेव्हल 1 चे उल्लंघन केल्यानंतर सामनाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.'

प्रसिद्धीपत्रकात त्याने काय चूक केली आहे, याबद्दल माहिती दिलेली नाही. मात्र प्रसिद्धी पत्रकानुसार त्याच्यावर कलम 2.7 अंतर्गत आरोप झाला आहे. आयपीएलच्या आचार संहितेमध्ये कलम 2.7 मध्ये दिले आहे की 'कोणत्याही सामन्यात घडलेल्या घटनेबाबत, कोणत्याही खेळाडू, संघ अधिकारी, सामनाधिकारी किंवा संघाबाबत सार्वजनिक टीका किंवा अनुचित टिप्पणी करणे आणि अशी टीपण्णी केव्हाही केली जात असली तरीही.'

खरंतर या सामन्यात राजस्थान गोलंदाजी करत असताना पंचांनी मैदानातील दवामुळे चेंडू बदलला होता. याबद्दल आर अश्विनने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्याला त्याच्या याच प्रतिक्रियेमुळे या कारवाईला सामोरे जावे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्याने म्हटले होते की 'पंचांनी त्यांच्या मर्जीनेच दवामुळे चेंडू बदलल्याने मी थोडा चकीत झालो. यापूर्वी असे कधीही झालेले मी पाहिले नाही आणि त्यामुळे मला आश्चर्य वाटले. खरं सांगायचे तर यावर्षीच्या आयपीएलमधील काही निर्णयांनी मला गोंधळात टाकले आहे. मला म्हणायचे आहे की मी आश्चर्यचकीत आहे की यामुळे चांगले किंवा वाईट निकाल लागू शकतात. कारण मला वाटते की तुम्हाला थोडा समतोलपणा साधणे गरजेचे आहे.'

अश्विन म्हणाला, 'एक गोलंदाजी करणारा संघ म्हणून आम्ही चेंडू बदलण्यास सांगितले नव्हते. पण चेंडू पंचांनी त्यांच्या मर्जीने बदलला. मी पंचांना याबद्दल विचारले आणि ते म्हणाले, आम्ही चेंडू बदलू शकतो. त्यामुळे मी आशा करतो की या हंगामात पुढे जेव्हाही दव असेल, तेव्हा ते प्रत्येकवेळी ते चेंडू बदलतील. कारण तुम्ही तुम्हाला हवे ते करू शकता. पण तुम्हाला काही मानके निश्चित करणे आवश्यक आहे.'

दरम्यान, या सामन्यात राजस्थानने चेन्नई सुपर किंग्सला 3 धावांनी पराभूत केले होते. तसेच या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार आर अश्विनला मिळाला होता. त्याने या सामन्यात गोलंदाजी करताना 4 षटकात 25 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तसेच फलंदाजी करताना त्याने 30 धावांची खेळी केली होती. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT