Punjab Kings Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023, PBKS vs KKR: पंजाबची विजयी सुरुवात! पावसाचा व्यत्यय आलेल्या सामन्यात कोलकाता पराभूत

आयपीएल 2023 स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा डकवर्थ लुईस नियमानुसार पराभव केला आहे.

Pranali Kodre

Punjab Kings sv Kolkata Knight Riders: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचा दुसरा सामना शनिवारी पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाब किंग्सने डकवर्थ लुईस नियमानुसार ७ धावांनी विजय मिळवला. यासह आयपीएलच्या 16 व्या हंगामाची विजयी सुरुवात पंजाबने केली आहे.

पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली येथे झालेल्या या सामन्यात पंजाबने केकेआरसमोर विजयासाठी 192 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरने 16 षटकात 7 बाद 146 धावा केलेल्या असताना पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सामना थांबवण्यात आला. अखेर डकवर्थ लुईस नियमानुसार या सामन्याचा निकाल लावण्यात आला.

या सामन्यात पंजाबने दिलेल्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात खराब झाली होती. केकेआरने मनदीप सिंग (2), अनुकुल रॉय (4) आणि आक्रमक खेळणाऱ्या रेहमनुल्लाह गुरबाज (22) यांच्या विकेट्स पाच षटकांच्या आतच 29 धावांमध्येच गमावल्या होत्या. केकेआरला पहिले दोन धक्के तर आर्शदीप सिंगनेच दिले.

अशा परिस्थितीत कोलकाताने वेंकटेश अय्यरला इम्पॅक्ट प्लेअरच्या रुपात संघात सामील करून घेतले. वंकेटश आणि कर्णधार नितीश राणाने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चौथ्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली. पण त्यांची भागीदारी रंगत असतानाच नितीशला 10 व्या षटकात सिकंदर रझाने 24 धावांवर बाद केले. पुढच्याच षटकात रिंकू सिंगही 4 धावांवर राहुल चाहरच्या गोलंदाजीवर बाद झाला.

पण केकेआरच्या आशा आंद्रे रसलवर बऱ्याच अवलंबुन होत्या. त्यानेही वेंकटेशला साथीला घेत या आशांना खरे ठरवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्याने आक्रमक फलंदाजी केली. त्यामुळे वेंकटेश आणि रसल हे दोघांनीही अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली. पण असे असतानाच सॅम करनने त्यांची भागीदारी तोडण्यात यश मिळवले.

करनने 19 चेंडूत 35 धावांवर खेळणाऱ्या रसेलला 15 व्या षटकात बाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात वेंकटेशही 34 धावा करून आर्शदीपविरुद्ध बाद झाला. त्यामुळे केकेआर अडचणीत सापडले होते. अशातच पाऊस सुरू झाल्याने सामना थांबला.

पंजाबकडून आर्शदीपने 3 विकेट्स घेतल्या. सॅम करन, नॅथन एलिस, सिकंदर रझा आणि राहुल चाहर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी पंजाबने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली होती. कर्णधार शिखर धवनबरोबर सलामीला उतरलेल्या प्रभसिमनर सिंगने आक्रमक सुरुवात केली होती. त्याने काही चांगले शॉट्स देखील खेळले. पण त्याला 23 धावांवर टीम साऊथीने बाद केले.

पण त्यानंतरही एक बाजू शिखरने सांभाळलेली असताना भानुका राजपक्षेने दुसऱ्या बाजूने केकेआरच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करताना अर्धशतक पूर्ण केले. त्याने शिखरबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारीही केली. पण त्यांची ही भागीदारी उमेश यादवने तोडली. त्याने राजपक्षेला 50 धावांवर बाद केले. राजपक्षेने 32 चेंडूत ही खेळी करताना 5 चौकार आणि 2 षटकार मारले.

त्यानंतर फलंदाजीला आलेल्या जितेश शर्मानेही छोटेखानी पण ताबडतोड 11 चेंडूत 21 धावांची खेळी केली. अशावेळी शिखरने दुसरी बाजू सांभाळताना काही चांगले शॉट्सही खेळले होते. पण अखेर त्याला 15 व्या षटकात वरुण चक्रवर्तीने बाद केले. शिखरने 29 चेंडूत 40 धावांची खेळी केली. त्याने या खेळीदरम्यान 6 चौकार मारले.

सिकंदर रझाने गोलंदाजीपूर्वी फलंदाजीतही योगदान देत 13 चेंडूत 16 धावांची खेळी केली. तसेच अखेरीस सॅम करन आणि शाहरुख खान यांनी नाबाद राहत पंजाबला २० षटकात ५ बाद 191 धावांपर्यंत पोहोचवले. सॅम करन 17 चेंडूत 26 धावा करून नाबाद राहिला, तर शाहरुख 7 चेंडूत 11 धावा करून नाबाद राहिला.

कोलकाताकडून टीम साऊथीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच उमेश यादव, सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT