IPL 2023: CSK कडून पदार्पणाच्या सामन्यातच 3 विकेट्स घेणारा कोण आहे राजवर्धन हंगारगेकर?

आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यातून चेन्नई सुपर किंग्सकडून पदार्पण करताना राजवर्धन हंगारगेकरने तीन विकेट्स घेत सर्वांचे लक्ष वेधले.
Rajvardhan Hangargekar
Rajvardhan Hangargekar Dainik Gomantak

Rajvardhan Hangargekar: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेला शुक्रवारपासून (31 मार्च) सुरुवात झाली. या स्पर्धेचा पहिलाच सामना रोमांचक झाला. गतविजेत्या गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात गुजरातने 5 विकेट्सने विजय मिळवत स्पर्धेचीही विजयी सुरुवात केली.

पण, याच सामन्यात एक युवा खेळाडूही चमकला, तो खेळाडू म्हणजे राजवर्धन हंगारगेकर. सीएसकेकडून खेळताना राजवर्धनने आयपीएलमध्ये शुक्रवारी पदार्पण केले. राजवर्धनने पदार्पणाच्या सामन्यातच प्रभावित करताना 4 षटकात 36 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. त्याने वृद्धिमान साहा, साई सुदर्शन आणि विजय शंकर यांच्या विकेट्स घेतल्या.

Rajvardhan Hangargekar
IPL 2023: पहिल्या मॅचआधी जगातील सर्वात मोठ्या मैदानात धोनी-हार्दिकची झोकात एन्ट्री, पाहा Video

तसे राजवर्धनचे नाव गेल्या दोन वर्षापासून क्रिकेट वर्तुळातील चर्चेतील नाव आहे. तो सर्वात आधी चर्चेत आला होता, ते 2022 साली झालेल्या 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान. कॅरेबियन बेटांवर झालेल्या या वर्ल्डकपसाठी राजवर्धनचा भारतीय संघात समावेश होता. त्याने या वर्ल्डकपमध्ये 5 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच आयर्लंडविरुद्ध त्याने महत्त्वपूर्ण 39 धावांची खेळी केली होती. त्याचा फलंदाजी करताना स्ट्राईक रेट 185.71 इतका होता.

ही कामगिरी बघून कदाचीत अनेकांना विशेष वाटणार नाही. पण राजवर्धनकडे चेंडू स्विंग करण्याची कला आहे. तसेच सातत्याने तो 140 किमीच्या वेगाने गोलंदाजी करू शकतो. इतकेच नाही, तर तो चांगला पॉवर हिटरही आहे. त्यामुळे कोणत्याही संघाला त्याच्यामुळे फलंदाजीत सखोलता मिळू शकते.

कदाचीत याच गोष्टींचा विचार करता चेन्नई सुपर किंग्सने त्याच्यावर आयपीएल 2022 च्या लिलावात 1.5 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दाखवली. पण पहिल्या हंगामात त्याला सीएसकेकडून एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. पण सीएसकेने त्याला 2023 साठीही कायम करत पहिल्याच सामन्यात पदार्पणाची संधीही दिली.

Rajvardhan Hangargekar
IPL 2023: अन् अरिजीत सिंगनं लाखो प्रेक्षकांसमोर थेट धोनीचे पायच धरले, चाहत्यांकडून होतय कौतुक

महाराष्ट्राकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा हंगारगेकर मुळचा महाराष्ट्रातील धाराशीवचा आहे. त्याने 2020 मध्ये कोरानामुळे त्याच्या वडीलांना गमावले होते. पण त्यानंतरही त्याने स्वत:ला सावरत क्रिकेटमध्ये आपले नाव मोठे करण्याकडे लक्ष केंद्रीत केले.

त्याने 19 वर्षांखालील वर्ल्डकपपूर्वीच महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघाकडून पदार्पण केले होते. त्याने 2021 मध्ये बडोदाविरुद्धच्या टी20 सामन्यातून महाराष्ट्राकडून पदार्पण केले होते. त्यानंतर आता तो तिन्ही क्रिकेट प्रकारासाठी महाराष्ट्राचे नियमितपणे प्रतिनिधित्व करताना दिसतो. त्याने देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीही आत्तापर्यंत प्रभावित करणारी राहिली आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की गेल्यावर्षी त्याच्यावर वयचोरीचा आरोपही झाला होता. तशी तक्रारही झाली होती की त्याने त्याचे खोटे वय सांगितले आहे. पण या आरोपातून तो नंतर बाहेर आला.

Rajvardhan Hangargekar
IPL 2023 Video: सिक्स रोखण्याचा प्रयत्न विलियम्सनला महागला? पहिल्या विजयानंतरही गुजरातला मोठा धक्का

राजवर्धनने आत्तापर्यंत 4 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 13 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 13 लिस्ट ए प्रकारातील सामने खेळले असून यामध्ये 25 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 9 टी20 सामने खेळले असून 8 विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीएसके संघात राजवर्धनसह त्याचा महाराष्ट्र संघातील संघसहकारी ऋतुराज गायकवाड देखील आहे. हे दोघेही गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्र संघाकडूनही एकत्र खेळत आहेत. दरम्यान राजवर्धन त्याच्याकडे असलेल्या अष्टपैलू कौशल्यामुळे सीएसकेसाठी महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. याचाच प्रत्येय त्याने पहिल्याच सामन्यात दिला आहे. आता यापुढे तो कशी कामगिरी करणार हे पाहाणे औत्सुक्याचे राहणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com