KKR  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: शेवटचे 5 बॉल अन् रिंकूचे 5 सिक्स! KKR ने हिसकावला GTचा विजयाचा घास, राशिदची हॅट्रिक व्यर्थ

आयपीएल 2023 च्या 13 व्या सामन्यात रिंकू सिंगने अखेरच्या 5 चेंडूत 5 षटकार ठोकत कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात टायटन्सला पराभवाचा धक्का दिला.

Pranali Kodre

Gujarat Titans vs Kolkata Knight Riders: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी(9 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सने रोमांचक सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सचा पराभव केला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केकेआरने अखेरच्या चेंडूवर तीन विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात अखेरच्या 5 चेंडूवर केकेआरला 28 धावांची गरज होती. यावेळी केकेआरकडून फलंदाजी करणाऱ्या रिंकू सिंगने यश दयाल विरुद्ध सलग पाच षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला.

या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना केकेआरसमोर विजयासाठी 205 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात चांगली झाली नव्हती. त्यांनी 28 धावांवरच रहमानउल्ला गुरबाज (15) आणि एन जगदीशन (6) यांच्या विकेट्स गमावल्या होत्या.

पण नंतर वेंकटेश अय्यर आणि कर्णधार नितीश राणा यांनी जबाबदारी स्विकाराली. वेंकटेशने आक्रमक खेळण्यास सुरुवात केली, तर दुसरी बाजू राणाने सांभाळली. या दोघांनी गुजरातच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचारही घेतला. त्यांच्या भागीदारीदरम्यान, वेंकटेशने त्याचे अर्धशतकही पूर्ण केले.

पण त्यांची भागीदारी 100 धावांची झाली असतानाच अल्झारी जोसेफने 14 व्या षटकात राणाला 45 धावांवर बाद केले. त्याने 29 चेंडूत ही खेळी करताना 4 चौकार आणि 3 षटकार ठोकले. तो बाद झाल्यानंतरही वेंकटेशने आपली लय कायम ठेवली होती. पण त्याला 16 व्या षटकात जोसेफनेच बाद केले. वेंकटेशने 40 चेंडूत 83 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 5 षटकार मारले.

यानंतर पुढच्याच षटकात गुजरातचा प्रभारी कर्णधार राशिद खानने कमाल केली. त्याने 17 व्या षटकात्या पहिल्या तिन्ही चेंडूवर अनुक्रमे आंद्रे रसल (1), सुनील नारायण (0) आणि शार्दुल ठाकूर (0) यांना बाद करत हॅट्रिक साजरी केली. या हॅट्रिकमुळे गुजरातने सामन्यात पुनरागमन केले होते. मात्र, रिंकू सिंग खेळपट्टीवर कायम होता. त्याच्या मदतीला उमेश यादव आला.

त्यातच या दोघांना 18 व्या षटकात मोहम्मद शमीने 5 धावाच दिल्या. मात्र, 19 व्या षटकात 14 धावा केकेआरला मिळाल्या. त्यामुळे केकेआरला अखेरच्या षटकात 29 धावांची गरज होती. या षटकातील पहिल्या चेंडूवर उमेशने एक धाव काढली. त्यामुळे स्ट्राईकवर रिंकू सिंग आला. त्यानंतर त्याने सलग 5 षटकार मारले आणि केकेआरच्या 20 षटकात 7 बाद 207 धावा झाल्या. त्यामुळे केकेआरने विजय मिळवला. रिंकू 21 चेंडूत 48 धावांसह नाबाद राहिला.

गुजरातकडून राशिदने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच अल्झारी जोसेफने 2 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमी आणि जोशुआ लिटील यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातकडून वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात केली होती. पण चांगल्या सुरुवातीनंतर साहा 17 धावांवर बाद झाला. पण नंतर गिल आणि साई सुदर्शनने आक्रमक खेळताना 67 धावांची भागीदारी केली.

मात्र त्यांची भागीदारी सुनील नारायणने 12 व्या षटकात तोडली. त्याने 31 चेंडूत 39 धावांवर खेळणाऱ्या गिलला बाद केले. यानंतर अभिनव मनोहर 14 धावा करून बाद झाला. पण नंतर सुदर्शनबरोबर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या विजय शंकरने तुफानी फलंदाजी केली.

मात्र, सुदर्शन 38 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 53 धावा करून 18 व्या षटकात बाद झाला. पण शंकरने आपली लय कायम ठेवत 21 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने 24 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांसह 63 धावांवर नाबाद राहात गुजरातला 20 षटकात 4 बाद 204 धावांपर्यंत पोहचवले. केकेआरकडून सुनील नारायणने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच सुयश शर्माने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT