IPL 2023 Gujarat Titans vs Chennai Super Kings, Qualifier 1: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित केला आहे. चेन्नई सुपर किंग्सने मंगळवारी झालेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सला 15 धावांनी पराभूत केले आहे.
त्यामुळे 28 मे रोजी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई यावेळी तब्बल दहाव्यांदा अंतिम सामना खेळताना दिसणार आहे. पण गुजरातला या पराभवानंतर आता अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी दुसरी एक संधी मिळणार आहे. गुजरातला आता 26 मे रोजी दुसरा क्वालिफायर सामना खेळावा लागणार आहे.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरातसमोर 173 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला 20 षटकात सर्वबाद 157 धावा करता आल्या.
चेन्नईने दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातकडून शुभमन गिल आणि वृद्धिमान साहा सलामीला फलंदाजीला उतरले होते. पण साहाला 12 धावांवरच दीपक चाहरने तिसऱ्या षटकात बाद केले. त्यानंतर हार्दिकही 6 व्या षटकात 8 धावांवर बाद झाला.
त्यानंतर दसून शनकाने शुभमन गिलला साथ देण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ११ व्या षटकात रविंद्र जडेजाने 17 धावांवर माधारी धाडले. पाठोपाठ 13 व्या षटकात जडेजाने डेव्हिड मिलरलाही त्रिफळाचीत केले. या विकेट्स जात असताना एक बाजू सांभाळलेल्या गिललाही अखेर 14 व्या षटकात दीपक चाहरने 42 धावांवर डेव्हॉन कॉनवेच्या हातून झेलबाद केले.
यानंतरही राहुल तेवतिया (3), विजय शंकर (14), दर्शन नळकांडे (0) स्वस्तात माघारी परतले. दरम्यान राशीद खानने झुंज देण्याचा प्रयत्न केला. त्याने 3 चौकार आणि 2 षटकारांसह 30 धावांची खेळीही केली. पण त्याची ही खेळी 19 व्या षटकात तुषार देशपांडेने संपुष्टात आणली. राशीदही कॉनवेच्या हातूनच झेलबाद झाला. अखेरीस शेवटच्या चेंडूवर मोहम्मद शमी बाद झाला.
रविंद्र जडेजा, महिश तिक्षणा, मथिशा पाथिराना आणि दीपक चाहर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच तुषार देशपांडेने 1 विकेट घेतली.
तत्पुर्वी, चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी सलामीला फलंदाजी केली होती. दरम्यान, ऋतुराज सामन्याच्या सुरुवातीलाच बाद दर्शन नळकांडेच्या चेंडूवर बाद झालेला, पण दर्शनने नो-बॉल टाकलेला असल्याने ऋतुराजला जीवदान मिळाले. या जीवदानाचा ऋतुराजने चांगला फायदा घेतला. त्याने आणि कॉनवेने 87 धावांची भागीदारी केली.
या भागीदारीदरम्यान, ऋतुराजने अर्धशतकही पूर्ण केले. पण त्याला मोहित शर्माने बाद केले. ऋतुराजने 44 चेंडूत 60 धावांची खेळी केली. त्यानंतर पुढच्याच षटकात शिवम दुबेही 1 धावेवर बाद झाला. अजिंक्य रहाणेने कॉनवेची साथ देण्याचा प्रयत्न केला. पण रहाणेला 17 धावांवर दर्शनने बाद केले. रहाणेचा झेल शुभमन गिलने घेतला.
पाठोपाठ 16 व्या षटकात कॉनवेही 40 धावांवर बाद झाला. तसेच अंबाती रायुडूला त्याची चांगली लय राखता आली नाही आणि तो 9 चेंडूत 17 धावा करून राशिद खानच्या गोलंदाजीवर दसून शनकाकडे झेल देत बाद झाला. कर्णधार एमएस धोनीही काही करू शकला नाही.
पण अखेरच्या षटकांमध्ये रविंद्र जडेजा आणि मोईन अलीच्या फटकेबाजीमुळे चेन्नईने 20 षटकात 7 बाद 172 धावा केल्या. जडेजा डावाच्या अखेरच्या चेंडूवर 22 धाावंवर असताना त्रिफळाचीत झाला. मोईन अली 9 धावांवर नाबाद राहिला.
गुजरातकडून मोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्यकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच दर्शन नळकांडे, राशिद खान आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.