Gujarat Titans Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023, GT vs CSK: घरच्या मैदानात गुजरातची विजयी सलामी! धोनीच्या चेन्नईला पराभवाचा धक्का

आयपीएल 2023 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत विजयी सुरुवात केली आहे.

Pranali Kodre

Gujarat Titans vs Chennai Super Kings: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 5 विकेट्सने विजय मिळवला. यासह गतविजेत्या गुजरातने नव्या हंगामाची सुरुवातही आपल्या घरच्या मैदानावर विजयाने केली आहे.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 178 धावा करत गुजरात समोर विजयासाठी 179 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने 19.2 षटकात 5 बाद 182 धावा करत सहज पूर्ण केला.

सीएसकेने दिलेल्या 179 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातकडून शुभमन गिल आणि वृद्धिमान साहा यांनी चांगली सुरुवात केली होती. पण राजवर्धन हंगारगेकरने वृद्धिमान साहाला 25 धावांवर बाद करत गुजरातला पहिला धक्का दिला.

त्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून दुखापतग्रस्त केन विलियम्सनच्या जागेवर खेळायला आलेल्या साई सुदर्शनने शुभमन गिलला साथ देण्याचा चांगला प्रयत्न केला, पण राजवर्धनने त्यालाही 22 धावांवर बाद केले. त्यानंतर रविंद्र जडेजाने हार्दक पंड्याचा (8) अडथळा दूर केला.

पण एक बाजू सांभाळत असलेल्या शुभमन गिलने काही नेत्रदीपक शॉट खेळताना अर्धशतक पूर्ण केले होते. पण त्यालाही 15 व्या षटकात पहिला इम्पॅक्ट प्लेअर ठरलेल्या तुषार देशपांडेने बाद करत सामन्यात रोमांच निर्माण केला. शुभमनने 36 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 63 धावांची खेळी केली. त्याच्यानंतर चांगला खेळणारा विजय शंकरही 27 धावांवर बाद झाला.

तो बाद झाल्यानंतर अखेरच्या दोन षटकात गुजरातला 23 धावांची गरज होती. पण १९ व्या षटकात दीपक चाहरविरुद्ध राहुल तेवातिया आणि राशिद खानने मिळून 15 धावा वसूल करत सामना आपल्या बाजूने झुकवला. अखेरच्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूतच राहुल तेवतियाने मोठे शॉट्स खेळत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. राहुल तेवातिया 15 धावांवर आणि राशिद 10 धावांवर नाबाद राहिला.

सीएसकेकडून पहिला आयपीएल सामना खेळणाऱ्या हंगारगेकरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच रविंद्र जडेजा आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम सीएसकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. पण प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या सीएसकेने सुरुवातीलाच डेव्हॉन कॉनवेची विकेट गमावली. त्याला मोहम्मद शमीने एका धावेवर त्रिफळाचीत करत आपली 100 वी आयपीएल विकेट घेतली.

पण नंतर सलामीवीर ऋतुराज गायकवाडने आपली लय कायम ठेवत मोईन अलीला साथीला घेत सीएसकेचा डाव पुढे नेला. या दोघांनीही आक्रमक खेळ केला. पण त्यांची जोडी जमली असतानाच मोईन अलीला (23) राशिद खानने माघारी धाडले. राशिदने त्याच्या पुढच्याच षटकात बेन स्टोक्सलाही (7) स्वस्तात बाद केले.

पण, त्यानंतर अंबाती रायुडूने संयमी खेळ करत आक्रमक खेळणाऱ्या ऋतुराजला चांगली साथ दिली. ऋतुराजनेही आपले आयपीएलमधील 11 वे अर्धशतक पूर्ण केले. पण यांची जोडी तोडण्यात जोशुआ लिटीलला यश मिळाले. त्याने रायुडूला 12 धावांवर बाद करत त्याची ऋतुराजबरोबरची 51 धावांची भागीदारी तोडली.

यानंतर ऋतुराज गायकवाडनेही शतकाच्या जवळ आल्यानंतर विकेट गमावली. त्याला अल्झारी जोसेफने 92 धावांवर बाद केले. ऋतुराजने 50 चेंडूत ही खेळी करताना 4 चौकार आणि तब्बल 9 षटकार मारले.

पण नंतर शिवम दुबे (19) आणि रविंद्र जडेजाही (1) फार काही करू शकले नाहीत. पण सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने अखेरच्या षटकात आक्रमक पवित्रा स्विकारत 13 धावा वसूल केल्या. त्यामुळे सीएसकेला 20 षटकात 178 धावांपर्यंत पोहचता आले. धोनी एक षटकार आणि एक चौकार मारून 14 धावांवर नाबाद राहिला.

गुजरातकडून राशिद खान, मोहम्मद शमी आणि अल्झारी जोसेफने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तसेच जोशुआ लिटिलने 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT