Ruturaj Gaikwad 92 runs inning: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात जायंट्स संघात होत आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात सीएसकेचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने अर्धशतकी खेळी केली.
या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून सीएसकेला प्रथम गोलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे सीएसकेकडून ऋतुराज आणि डेव्हॉन कॉनवे सलामीला फलंदाजीसाठी उतरले. मात्र कॉनवेला सुरुवातीलाच मोहम्मद शमीने एका धावेवर त्रिफळाचीत केले. पण ऋतुराजने आपली लय न गमावता आक्रमक फलंदाजी केली.
त्याने आक्रमक खेळताना अर्धशतकही पूर्ण केले. मात्र त्याचे शतक केवळ 8 धावांनी हुकले. त्याला अल्झारी जोसेफने 18 व्या षटकात बाद केले. त्यावेळी ऋतुराज 92 धावांवर खेळत होता. त्याने ही खेळी 50 चेंडूत 4 चौकार आणि 9 षटकार मारले. त्याचा झेल शुभमन गिलने घेतला.
दरम्यान, ही खेळी करताना ऋतुराजने काही विक्रमांना गवसणी घातली आहे. तो आयपीएल हंगामातील पहिल्या सामन्यात सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
या यादीत अव्वल क्रमांकावर ब्रेंडन मॅक्युलम असून त्याने 2008 साली पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध नाबाद 158 धावांची खेळी केली होती.
तसेच या यादीत दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा असून त्याने 2015 सालच्या आयपीएलमध्ये पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मुंबई इंडियन्सकडून नाबाद 98 धावांची खेळी केली होती.
आयपीएलमध्ये पहिल्या 37 डावांनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये ऋतुराज अव्वल क्रमांकावर आला आहे. त्याच्या आता 37 डावांनंतर आयपीएलमध्ये 1299 धावा पूर्ण झाल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने पहिल्या 37 आयपीएल डावांमध्ये 1271 धावा केल्या होत्या.
सीएसकेसाठी एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ऋतुराजने दुसरा क्रमांक मिळवला असून त्याने रॉबिन उथप्पा, ब्रेंडन मॅक्युलम आणि मायकल हसी यांची बरोबरी केली आहे.
उथप्पाने 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध, मॅक्युलमने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 2015 मध्ये आणि हसीने पंजाब किंग्सविरुद्ध 2008 साली प्रत्येकी 9 षटकार मारले होते. तसेच या यादीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मुरली विजयने 2010 साली राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नईत झालेल्या सामन्यात 11 षटकार मारले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.