Anish Bhanwala: इजिप्तची राजधानी कैरो येथे आयआयएसएफ रायफल आणि पिस्तुल वर्ल्डकप झाला. या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताचा 20 वर्षीय अनिश भानवाला याने 25 मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकरात कांस्य पदकाची कमाई केली. त्यामुळे या प्रकारात पदकाची भारताची तब्बल 12 वर्षांची प्रतिक्षा संपुष्टात आली.
गेल्या 12 वर्षात 25 मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकरात भारताला पदक मिळाले नव्हते. मात्र, अनिषने तो दुष्काळ संपवला. महत्त्वाचे म्हणजे अनिषसाठीही हे वरिष्ठ स्तरावरील पहिलेच वर्ल्डकप पदक ठरले आहे.
यापूर्वी विजय कुमारने भारताला या प्रकारात मेडल मिळवून दिले होते. त्याने 2012 मध्ये लंडनला झालेल्या ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. तसेच त्याने वर्ल्डकपमध्ये 2 पदके जिंकली आहेत.
दरम्यान, आयआयएसएफ रायफल आणि पिस्तुल वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 25 मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकरात इटलीच्या मासिमो स्पिनेलाने सुवर्णपदक जिंकले, तसेच क्लेमेंट बेसागुएटने रौप्य पदक जिंकले.
अनिषने मिळवलेल्या पदकामुळे भारताचे या वर्ल्डकपमध्ये एकूण 7 पदके झाले आहेत. यामध्ये 4 सुवर्णपदकांचाही समावेश आहे.
दरम्यान, अनिषने त्याचा हा विजय त्याच्या प्रशिक्षक हरप्रीत सिंग यांना समर्पित केला आहे. त्याने म्हटले की 'त्यांनीही अनेक फायनल्स भारतासाठी खेळले, पण त्यांना पदक जिंकता आले नव्हते.'
तसेच अनिषने हे पदक म्हणजे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे असल्याचे म्हटले आहे. त्याने म्हटले की 'यापूर्वी दोन फायनल्स खेळल्या, ज्यात मी पाचव्या क्रमांकावर राहिलो होतो. त्यामुळे मला आज पहिले वर्ल्डकप पदक मिळवण्याची प्रबळ इच्छा होती.'
त्याचबरोबर फायनल्सबद्दल बोलताना अनिष म्हणाला, 'मी मला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्याचा फायदा झाला. राष्ट्रीय शिबिरादरम्यान आम्ही दबावाच्या स्थितीत स्वत:वर नियंत्रण कसे ठेवायचे याबद्दलही तयारी करत होतो. त्याची इथे मदत झाली.'
'या पदकाच्या सामन्यातील चौथी फेरी कठीण होती. मला माजी ऑलिम्पिक चॅम्पियन ख्रिस्तियन रिट्जला पराभूत करायचे होते. मी या फेरीदरम्यान स्वत:ला सांगितले की ही फेरी माझे स्वप्न पूर्ण करेल. मी याची कल्पना केली आणि त्यांची योग्यप्रकारे अंमलबजावणीही केली. त्यामुळे मला आनंद झाला आहे.'
याशिवाय अनिषने सांगितले की या स्पर्धेत अन्य भारतीय नेमबाजांनी केलेल्या शानदार कामगिरीने त्याला प्रेरणा मिळाली होती. अनिषने पदक जिंकण्याच्या दोन दिवसांपूर्वीच या स्पर्धेत 22 वर्षीय ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने वैयक्तिक 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.