Rahul Dravid: भारताच्या दिग्गज क्रिकेटपटुंमध्ये समावेश होत असलेल्या राहुल द्रविडच्या भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून केलेल्या कामगिरीवर वर्षभरातच सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. रवी शास्त्री यांच्यानंतर हे महत्वाचे पद द्रविडकडे आले होते. भारतीय क्रिकेट चाहत्यांनाही द्रविडकडून खूप अपेक्षा होत्या. पण टी-20 वर्ल्ड कपमधील भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर राहुल द्रविडदेखील टीकाकारांच्या रडारवर आला आहे.
त्यामुळे बीसीसीआयदेखील आता राहुल द्रविडच्या प्रशिक्षक म्हणून केलेल्या कामगिरीची समिक्षा करण्याच्या तयारीत आहे. तथापि, बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या आगामी मालिकेपर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेनंतर द्रविडच्या प्रशिक्षक म्हणून केलेल्या सर्वंकष कामगिरीचा विचार केला जाणार आहे.
राहुल द्रविडचा सध्या बीसीसीआयसोबत जो करार आहे, त्यानुसार त्याला दरवर्षी 10 कोटी रूपये मेहनताना दिला जातो. भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होण्यापुर्वी राहुल बंगळुरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत होता. द्रविडच्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत भारताला दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या देशात कसोटी मालिकेत पराभूत केले होते तर एकदिवसीय मालिकेत भारताला एकही सामना जिंकता आला नव्हता.
बीसीसीआय कटु निर्णय घेणार...
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरीजनंतर राहुल द्रविडच्या कामगिरीचे मुल्यमापन केले जाणार आहे. या वर्षातील ती अखेरची मालिका असेल. टी-20 वर्ल्ड कपमधील सेमी फायनलध्ये भारताची कामगिरी चांगली नव्हती. द्रविडबाबत बोलायचे तर आमच्याकडे ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सीरीजपर्यंतचा अवधी आहे. एकदा नवीन सीएसी आल्यानंतर आम्ही चर्चा करू. पुढील वर्षी वर्ल्ड कप आहे. त्यामुळे काही कटु निर्णय घ्यावे लागतील.
पुढील वर्षी भारतात वर्ल्ड कप स्पर्धा
पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा भारतात होणार आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात ही स्पर्धा पार पडणार आहे. भारत स्वतःच यजमान असल्याने आणि भारतातच क्रिकेटची मोठी फॅन फॉलोविंग असल्याने भारताचा परफॉरमन्स चांगला राहावा, यासाठी बीसीसाआय आत्तापासूनच तयारीला लागणार आहे. संघ निवडीच्या अनुषंगाने आत्तापासूनच खेळाडुंच्या कामगिरीवर लक्ष ठेवले जाणार आहे.
विराट कोहली कर्णधार असताना तसेच रोहित शर्माच्याही कर्णधारपदाच्या काळात भारतीय संघ आयसीसीची ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. राहुल द्रविडच्या प्रशिक्षकपदाचा हा काळ आहे. तथापि, सध्या लगेचच हटविण्याच्या किंवा नवा प्रशिक्षक नेमण्याच्या मुडमध्ये बीसीसीआय नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.