India Women's Hockey Team Won Bronze Medal at 19th Asian Games Hangzhou:
चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. शनिवारी (7 ऑक्टोबर) महिलांच्या हॉकी स्पर्धेत कांस्य पदकासाठी भारत आणि जपान यांच्यात सामना झाला.
या सामन्यात भारतीय महिला संघाने 2-1 अशा फरकाने जपानला पराभूत करत कांस्य पदकावर हक्क सांगितला. या विजयासह 5 वर्षांपूर्वी 2018 ला जकार्ताला झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील अंतिम सामन्यातील पराभवाचाही भारतीय संघाने एकप्रकारे बदला पूर्ण केला.
जकार्ताला झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अंतिम सामन्यात जपानने भारतीय संघाला पराभूत केले होते. त्यामुळे भारतीय महिला संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. दरम्यान, यंदा जपान महिला संघाला पदाशिवायच मायदेशी परतावे लागणार आहे.
शनिवारी झालेल्या कांस्य पदकाच्या सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी सकारात्मक सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पाचव्या मिनिटाला भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. याचा फायदा घेत दीपिकाने भारतासाठी गोल नोंदवला.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी एकमेकांना तगडी लढत देताना एकही गोल होऊ दिला नाही. पण पहिल्या हाफनंतरच्या भरपाई वेळेत पेनल्टी कॉर्नरवर जपानची कर्णधार युरी नागाई हिने गोल करत बरोबरी साधली. ही बरोबरी तोडण्यात भारत आणि जपानला तिसऱ्या क्वार्टरमध्ये अपयश आले.
त्यामुळे चौथ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांकडून अटीतटीचा खेळ सुरू होता. अशातच 50 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर सुशिला चानूने अचूक निशाणा साधला आणि भारतासाठी दुसरा गोल नोंदवला. तिचा हा गोल निर्णायक ठरला. भारताने नंतर 2-1 अशी आघाडी कायम ठेवली आणि अखेर सामना जिंकत पदकावर नाव कोरले.
भारतीय महिला हॉकी संघाचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील सातवे पदक आहे. भारतीय हॉकी संघाने आत्तापर्यंत 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदके जिंकले आहेत.
हॉकी इंडियाकडून 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाला रोख बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे. पदक विजेत्या भारतीय संघातील खेळाडूंना प्रत्येकी 3 लाख रुपये दिले जातील, तर सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना दीड लाख रुपये दिले जातील.
दरम्यान, 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हॉकीमध्ये भारताला दोन पदके मिळाली आहेत भारताच्या पुरुष संघाने अंतिम सामन्यात जपानला 5-1 ने पराभूत करत सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. त्यानंतर आता महिला संघानेही जपानलाच पराभूत करत कांस्य पदक जिंकले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.