India Women vs Australia Women, 3rd ODI at Wankhede Stadium:
भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यात वनडे मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (2 जानेवारी) खेळला जात आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात असून ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 339 धावांचे आव्हान ठेवले आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 338 धावा उभारल्या. भारतीय महिला संघाविरुद्ध उभारलेली ही वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. ऑस्ट्रेलियाकडून फोबी लिचफिल्डने शतकी खेळी केली, तर कर्णधार एलिसा हेलीने अर्धशतक केले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हेलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडून हेलीसह लिचफिल्ड सलामीला फलंदाजीला उतरली. हेली आणि लिचफिल्ड यांनी दमदार फलंदाजी करत भारताला सुरुवातीला यश मिळू दिले नाही.
मिळालेल्या चांगल्या सुरुवातीचा फायदा त्यांनी पुढे घेतला आणि दीडशतकी भागीदारी केली. जवळपास 29 व्या षटकापर्यंत भारताला एकही विकेट मिळाली नव्हती. अखेर 29 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पुजा वस्त्राकरने हेलीला त्रिफळाचीत करत भारताला पहिले यश मिळवून दिले. एलिसा हेलीने 85 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 82 धावा केल्या.
त्यानंतर धोकादायक एलिस पेरीचा अडथळा अमनज्योत कौरने 16 धावांवरच दूर केला. त्यापाठोपाठ काही वेळातच 36 व्या षटकात श्रेयंका पाटीलने लागोपाठ दोन चेंडूंवर ऑस्ट्रेलियाला दोन धक्के दिले. तिने बेथ मुनीला 3 धावांवर आणि ताहलिया मॅकग्राला शुन्यावर पायचीत करत माघारी धाडले.
त्यानंतर ऍश्ले गार्डनरने लिचफिल्डला चांगली साथ दिली. यादरम्यान, लिचफिल्डने शतकही पूर्ण केले. अखेर तिला 40 व्या षटकात दिप्ती शर्माने बाद केले. लिचफिल्डने 125 चेंडूत 119 धावांची खेळी केली. या खेळीत तिने 16 चौकार आणि 1 षटकार मारला.
अखेरीस गार्डनर (30), ऍनाबेल सदरलँड (23), एलेना किंग (26*) आणि जॉर्जिया वेरहॅम (11*) यांनी छोटेखानी, पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ३३८ धावांचा टप्पा गाठला.
भारताकडून गोलंदाजीत श्रेयंका पाटीलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच अमनज्योत कौरने 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर पुजा वस्त्राकर आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.