भारत विरुद्ध इंग्लंड संघात चालू असलेल्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याला शुक्रवारी (23 फेब्रुवारी) सुरुवात झाली. या सामन्यात दुसऱ्या दिवस अखेर भारताने पहिल्या डावात ७३ डावात 7 बाद 219 धावा केल्या आहेत. त्यामुळे दिवस अखेर भारत 134 धावांनी अद्याप पिछाडीवर आहे. भारताकडून ध्रुव जुरेल 30 धावांवर आणि कुलदीप यादव 17 धावांवर नाबाद आहे.
दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात इंग्लंडचा पहिला डाव 104.5 षटकात 353 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला होता. भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्माने सलामीला फलंदाजी केली.
मात्र तिसऱ्याच षटकात कर्णधार रोहितला अवघ्या 2 धावांवर जेम्स अँडरसनने माघारी धाडले. पण त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी डाव सावरताना अर्धशतकी भागीदारी केली. हे दोघेही भारताचा डाव पुढे नेत होते.
परंतु, त्यांची भागीदारी धोकादायक वाटत असतानाच 25 व्या षटकात शोएब बाशीरने गिलला पायचीत केले. गिलने 38 धावा केल्या. यामुळे बाशीरचाही आत्मविश्वास वाढल्याचे दिसले.
बाशीरने सातत्याने अचूक टप्प्यावर चेंडू टाकत भारतीय फलंदाजांना प्रश्न विचारणे सुरू ठेवले. त्यातच रजत पाटीदारही अडकला. पाटीदार 17 धावांवर पायचीत केले. तसेच रविंद्र जडेजालाही बाशीरने 12 धावांवर बाद केले होते. त्यामुळे भारतीय संघ संकटात सापडला होता. तरी सर्फराजसह जयस्वालने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, सर्फराज दोनवेळा धावबाद होण्यापासून वाचला. यादरम्यान जयस्वालने अर्धशतकही पूर्ण केले. पण यावेळी त्याला अर्धशतकाचे रुपांतर शतकात करता आले नाही. जयस्वाल 117 चेंडूत 73 धावा करून 47 व्या षटकात बाद झाला. त्यालाही बशीरनेच त्रिफळाचीत केले. बशीरने भारताची वरची आणि मधली पूर्ण उद्ध्वस्त केली.
त्यातच सर्फराजही फार काही करू शकला नाही, त्याला टॉम हर्टलीने 14 धावांवर माघारी धाडले. आर अश्विनही 1 धावेवरच माघारी परतला. मात्र त्यानंतर कुलदीप यादवने यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलला चांगली साथ देताना इंग्लंडच्या गोलंदाजांना दिवस संपेपर्यंत आणखी यश मिळू दिले नाही. त्यांनी दिवस अखेरपर्यंत नाबाद 42 धावांची भागीदारी केली.
इंग्लंडकडून पहिल्या डावात दुसऱ्या दिवसाखेरपर्यंत बाशीरने 4 विकेट्स घेतल्या, तर टॉम हर्टलीने 2 विकेट्स घेतल्या. तसेच जेम्स अँडरसनने 1 विकेट घेतली.
तत्पुर्वी या सामन्यात दुसऱ्या दिवशी इंग्लंडने 91 षटकापासून आणि 7 बाद 302 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. यावेळी शतक करणारा जो रुटने आणि रॉबिन्सन खेळत होते. त्यांनी चांगली सुरुवातही केलेली.
परंतु, रविंद्र जडेजाची फिरकी गोलंदाजीपुढे इंग्लंडची तळातली फलंदाजी गडगडली. रॉबिन्सन अर्धशतकानंतर बाद झाला. त्याने 58 धावा केल्या. तसेच बशीर आणि जेम्स अँडरसन एकही धाव न करता बाद झाले. जो रुट 274 चेंडूत 122 धावा करून नाबाद राहिला.
त्याआधी इंग्लंडकडून झॅक क्रावलीने 42 आणि बेन फोक्सने 47 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केल्या. तसेच जॉनी बेअरस्टोने 35 चेंडूत 38 धावांची आक्रमक खेळी केली. बेन फोक्स आणि जो रुट यांनी 6 व्या विकेटसाठी 113 धावांची भागादीरीही केली होती. तसेच रुट आणि रॉबिन्सन यांच्यातही शतकी भागीदारी झाली. त्यामुळे इंग्लंडला 350 धावांचा टप्पा पार करता आला.
भारताकडून पहिल्या डावात गोलंदाजी करताना रविंद्र जडेजाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच आकाश दीपने 3 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराजने 2 विकेट्स घेतल्या. आर अश्विनने 1 विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.