Team India: बीसीसीआयच्या निवड समीतीने रविवारी (19 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी आणि त्यानंतर होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
दरम्यान, ही घोषणा करताना माहिती देण्यात आली आहे की वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा कौटुंबिक कारणामुळे उपलब्ध नसेल, त्यामुळे या सामन्यात हार्दिक पंड्या नेतृत्व करेल. पण दुसऱ्या वनडेपासून रोहित भारतीय संघात कर्णधार म्हणून पुनरागमन करेल. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेत हार्दिक उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल.
याबरोबरच उर्वरित दोन्ही कसोटी सामन्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात जयदेव उनाडकटचे पुनरागमन झाले आहे. त्याला रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यासाठी दुसऱ्या कसोटीतून मुक्त करण्यात आले होते.
तसेच उनाडकटला वनडे मालिकेसाठीही भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे उनाडकटच्या नेतृत्वाखाली रविवारीच सौराष्ट्रने रणजी ट्रॉफी 2022-23 चे विजेतेपद जिंकले आहे.
दरम्यान, पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवडलेला संघच तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी कायम करण्यात आला आहे.
बुमराहची प्रतिक्षा कायम
दरम्यान, जसप्रीत बुमराहचा समावेश कसोटी सामन्यांबरोबरच, वनडे मालिकेसाठीही करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता बुमराहचे आंतरराष्ट्रीय पुनरागमन आणखी लांबले आहे. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर आयपीएल 2023 स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा भारतीय संघाच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे किमान जूनपर्यंत तरी आता बुमराहच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
कधी होणार सामने?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना 1 ते 5 मार्च दरम्यान इंदोरला होणार आहे. त्यानंतर 9 ते 13 मार्च दरम्यान अहदाबादला चौथा कसोटी सामना होणार आहे. त्यानंतर 17 ते 22 मार्चदरम्यान वनडे मालिका खेळली जाईल. वनडे मालिकेतील तिन्ही सामने अनुक्रमे 17, 19 आणि 22 मार्च रोजी मुंबई, विशाखापट्टणम आणि चेन्नई येथे होणार आहेत.
तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार) (पहिल्या सामन्यासाठी अनुपलब्ध), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार) (पहिल्या सामन्यासाठी कर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.