India Women's Team X/BCCIWomen
क्रीडा

INDW vs ENGW: भारतीय महिलांनी कसोटी इतिहासात कोरलं सुवर्णाक्षरांनी नाव! तीनच दिवसात उडवला इंग्लंडचा धुव्वा

Pranali Kodre

India Women vs England Women, Mumbai Test:

भारतीय महिला क्रिकेट संघाने शनिवारी (16 डिसेंबर) इंग्लंड महिला संघाविरुद्ध नवी मुंबईत पार पडलेल्या एकमेव कसोटी सामन्यात तब्बल 347 धावांनी विजय मिळवला. भारताने सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी विजयावर शिक्कामोर्तब केले. याबरोबरच मोठा इतिहासही रचला. या सामन्यात 9 विकेट्स घेणारी दिप्ती शर्मा सर्वोत्तम खेळाडू ठरली.

भारतीय संघाने महिलाच्या कसोटी क्रिकेट इतिहासात धावांच्या तुलनेत सर्वात मोठा विजय नोंदवण्याचा विश्वविक्रम केला आहे. याशिवाय भारताने इंग्लंड महिला संघाविरुद्ध मायदेशात पहिल्यांदाच कसोटी विजय मिळवला आहे.

तसेच भारतीय महिला संघाचा इंग्लंडविरुद्धचा हा कसोटीतील एकूण तिसरा विजय आहे. यापूर्वी 2006 साली टाँटनला झालेल्या कसोटीत भारताने इंग्लंडला 5 विकेट्सने विजय मिळवला होता, तर 2014 साली वॉर्मस्लीला झालेल्या कसोटीत भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला होता.

डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने दुसऱ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात 6 बाद 186 धावा केल्या होत्या. याच धावसंख्येवर तिसऱ्या दिवशी सुरुवातीलाच भारतीय संघाने दुसरा डाव घोषित केला. त्यामुळे भारताने पहिल्या डावातील 292 धावांच्या आघाडीसह इंग्लंडसमोर 479 धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव 27.3 षटकात 131 धावांवर संपला. इंग्लंडकडून कर्णधार हिदर नाईटने 21 धावा केल्या, तर चार्ली डीनने 20 धावांची नाबाद खेळी केली. याव्यतिरिक्त कोणालाही 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. रेणुका सिंग आणि पुजा वस्त्राकर यांनी सुरुवातीलाच इंग्लंडला मोठे धक्के दिले.

त्यानंतर मधली आणि तळातली फलंदाजी फळी दिप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी उद्धस्त केली. इंग्लंडकडून नाईट आणि डीन व्यतिरिक्त सोफीया डंक्ली (15), टॅमी ब्युमाँट (17), डॅनी व्यॅट (12), सोफी इक्लेस्टोन (10) आणि केट क्रॉस (16) यांनी दोन आकडी धावसंख्या पार केली, मात्र यातील कोणालाही मोठी खेळी करता आली नाही.

भारताकडून गोलंदाजीत दुसऱ्या डावात दिप्ती शर्माने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच पुजा वस्त्राकरने 3 विकेट्स घेतल्या, तर राजेश्वरी गायकवाडने 2 विकेट्स घेतल्या आणि रेणूका सिंगने 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, भारताकडून दुसऱ्या डावात कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. याशिवाय शफली वर्मा (33), स्मृती मानधना (26), जेमिमाह रोड्रिग्स (27), दिप्ती शर्मा (20) आणि पुजा वस्त्राकर (17*) यांनी छोटेखानी खेळी करत योगदान दिले.

इंग्लंडकडून दुसऱ्या डावात चार्ली डीनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तसेच सोफी इक्लेस्टोनने 2 विकेट्स घेतल्या.

पहिल्या डावातही भारताचे वर्चस्व

भारताने 104.4 षटकात पहिल्या डावात सर्वबाद 410 धावा केल्या होत्या. भारताकडून शुभा सतीशने 69 धावांची सर्वोच्च खेळी केली. तसेच यास्तिका भाटीयाने 66 धावांची, दीप्तीने 67 धावांची आणि जेमिमाह रोड्रिग्सने 68 धावांची खेळी केली. त्याचबरोबर कर्णधार हरमनप्रीत कौरने 49 धावांची खेळी केली.

इंग्लंडकडून सोफी इक्लेस्टोन आणि लॉरेन बेल यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर केट क्रॉस, नतालिया सायव्हर-ब्रंट आणि चार्ली डीन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 35.3 षटकातच 136 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताने या डावात 292 धावांची आघाडी घेतली. इंग्लंडकडून पहिल्या डावात नतालिया सायव्हर-ब्रंटने 70 चेंडूत 59 धावांची खेळी केली. पण तिच्याव्यतिरिक्त अन्य कोणाला खास काही करता आले नाही.

भारताकडून गोलंदाजी करताना दिप्ती शर्माने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या, तसेच स्नेह राणाने 2 विकेट्स घेतल्या, तर रेणूका सिंग आणि पुजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT