भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार आता आसामच्या गुवाहाटी शहरात पोहोचला आहे. आज, रविवारी संध्याकाळी ७ वाजता बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर मालिकेतील तिसरा सामना रंगणार आहे.
या सामन्यात सर्वांच्या नजरा भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मावर खिळल्या आहेत. आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा तरुण फलंदाज आज क्रिकेटच्या मैदानावर एक मोठा विक्रम प्रस्थापित करण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. अवघ्या ३ पावलांच्या अंतरावर असलेल्या या विक्रमामुळे रोहित शर्माचा एक खास विक्रम मोडीत निघू शकतो.
भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावावर न्यूझीलंडविरुद्धच्या एका टी-२० मालिकेत सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम आहे. २०२१-२२ च्या मालिकेदरम्यान 'हिटमॅन' रोहितने १० षटकार खेचले होते.
अभिषेक शर्माने या चालू मालिकेत आतापर्यंत ८ षटकार ठोकले आहेत. आजच्या सामन्यात अभिषेकने केवळ ३ षटकार मारले, तर तो रोहित शर्माचा १० षटकारांचा विक्रम मागे टाकेल आणि न्यूझीलंडविरुद्ध एका मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरेल. २ षटकार मारल्यास तो रोहितच्या विक्रमाची बरोबरी करेल.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत १० षटकार मारण्याचा पराक्रम आतापर्यंत केवळ मोजक्याच खेळाडूंनी केला आहे. यामध्ये रोहित शर्मासह केएल राहुल, केन विल्यमसन, मार्टिन गप्टिल आणि टिम सायफर्ट यांचा समावेश आहे.
तसेच श्रेयस अय्यरने एका मालिकेत ९ षटकार मारण्याची कामगिरी केली होती. अभिषेक शर्माने पहिल्याच सामन्यात आपल्या फलंदाजीची धार दाखवत ८ षटकार ठोकले होते, मात्र दुसऱ्या सामन्यात त्याला विशेष चमक दाखवता आली नाही. त्यामुळे आज गुवाहाटीत तो ही कसर भरून काढण्यासाठी सज्ज झाला आहे.
अभिषेक शर्माची नजर केवळ एका मालिकेतील विक्रमावर नाही, तर रोहित शर्माच्या नावावर असलेल्या एकूण षटकारांच्या विक्रमावरही आहे. रोहितने न्यूझीलंडविरुद्ध १७ डावांत एकूण २७ षटकार मारले आहेत.
अभिषेककडे या मालिकेत अजून तीन सामने शिल्लक आहेत. जर त्याने उर्वरित सामन्यांत २० षटकार मारले, तर तो रोहितचा हा मोठा टप्पाही पार करू शकतो. सध्या ज्या फॉर्ममध्ये अभिषेक आहे, ते पाहता गुवाहाटीच्या मैदानावर आज षटकारांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.