टीम इंडियाचा स्टार युवा ओपनिंग बॅट्समन यशस्वी जयस्वाल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. जवळपास प्रत्येक डावात त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. यामुळेच तो आयसीसी कसोटी क्रमवारीतही गगनभरारी घेत आहे.
दरम्यान, जयस्वालने आयसीसी कसोटी क्रमवारीत आपले सर्वकालीक उच्च स्थान गाठले आहे. त्याने आधीच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला मागे टाकले होते, आता त्याने टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे.
दरम्यान, यशस्वी जयस्वाल इंग्लंडविरुद्ध जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 7 मार्चपासून धरमशाला येथे होणार आहे. यामध्येही अनेक मोठे विक्रम त्याच्या निशाण्यावर असणार आहेत. दरम्यान, सामन्याच्या एक दिवस आधी यशस्वी जयस्वालने आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे. तो सध्या दहाव्या क्रमांकावर आहे.
याआधी, आयसीसीने गेल्या आठवड्यात रँकिंग जाहीर केली तेव्हा त्याचे रेटिंग 727 होते आणि तो 12 व्या क्रमांकावर होता. यादरम्यान तो एकही कसोटी खेळला नाही, त्यामुळे त्याच्या रॅंकिंगवर कोणताही परिणाम झालेला नाही. म्हणजेच ती अजूनही 727 आहे, पण जयस्वालला इतर फलंदाजांच्या खराब कामगिरीचा फायदा झाला आणि तो थेट दहाव्या क्रमांकाचा खेळाडू बनला. हे देखील जयस्वालचे सर्वकालीक उच्च स्थान आहे. गेल्या आठवड्यातच त्याने रोहित शर्माला मागे टाकले होते.
दरम्यान, क्रमवारीत यशस्वी जयस्वालला दोन अंकाचा फायदा झाला आहे, तर रोहित शर्मानेही (Rohit Sharma) 13व्या स्थानावरुन 11व्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याचे रेटिंग आता 720 आहे. रोहित आणि जयस्वाल मालिकेतील शेवटचा कसोटी सामना खेळतील तेव्हा त्यानंतर क्रमवारीत काय बदल होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दरम्यान, रोहित आणि जयस्वाल यांनी गेल्या आठवड्यापासून एकही कसोटी समना खेळलेला नाही. मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या खराब कामगिरीचा त्यांना फायदा झाला आहे.
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ट्रॅव्हिस हेड आता एका अंकाने घसरुन 12व्या स्थानावर आला आहे. त्याचे रेटिंग 718 आहे, तर मार्नस लॅब्युशेनने 5 अंक गमावले आहेत. तो सध्या 707 च्या रेटिंगसह 13 व्या स्थानावर आहे. याचा फायदा रोहित आणि यशस्वी यांना झाला आहे.
त्याचवेळी, जर कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीबद्दल बोलायचे झाल्यास, भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) बादशाहत कायम आहे. त्याचे रेटींग 867 आहे. बुमराह चौथ्या कसोटीत खेळला नाही. फिरकीपटू आर अश्विन (846) दुसऱ्या तर कागिसो रबाडा (834) तिसऱ्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड (822) आणि फिरकी गोलंदाज नॅथन लायन (797) यांना चांगल्या कामगिरीचा फायदा झाला आहे. हेझलवूड चौथ्या स्थानावर तर लियॉनने दोन अंकांनी प्रगती करत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. वेलिंग्टनमध्ये हेझलवूडने चार आणि लियॉनने 10 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाने हा सामना 172 धावांनी जिंकला होता.
जयस्वालने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 80 धावांची इनिंग खेळली होती. दुसऱ्या कसोटीत त्याने 209 धावा केल्या. मालिकेतील तिसऱ्या सामन्यातही त्याने 214 धावांची नाबाद खेळी खेळली. आता अवघ्या क्रिकेट जगताच्या नजरा 7 मार्चपासून धरमशाला येथे सुरु होणाऱ्या शेवटच्या कसोटीकडे लागल्या आहेत, जिथे तो आणखी काही नवीन विक्रम आपल्या नावावर करण्याच्या वाटेवर आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.