ICC Hall of Fame:
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) सोमवारी मोठी घोषणा करण्यात आली. वर्ल्डकप 2023 स्पर्धा सुरू असतानाच आयसीसीने यंदा तीन दिग्गज खेळाडूंचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला आहे. आयसीसीकडून गेल्या अनेक वर्षांपासून दिग्गज खेळाडूंचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करत सन्मान केला जातो.
यंदा आयसीसीने भारताचा धडाकेबाज सलामीवीर विरेंद्र सेहवाग, भारताची दिग्गज महिला क्रिकेटपटू डायना एडुलजी आणि श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू अरविंद डी सिल्वा या तीन खेळाडूंचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे.
आयसीसीकडून खेळाडूंचा निवृत्तीनंतर 7 वर्षांनी हॉल ऑफ फेमसाठी विचार केला जातो. यावेळी त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केलेल्या शानदार कामगिरीचा गौरव केला जातो.
विशेष गोष्ट अशी की डायना एडुलजी या पहिल्या भारतीय महिला खेळाडू आहेत, ज्यांचा समावेश आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये करण्यात आला आहे. यापूर्वी कोणत्याही महिला खेळाडूचा हॉल ऑफ फेमध्ये समावेश करण्यात आला नव्हता.
अष्टपैलू डायना एजुलजी यांनी यांनी भारतासाठी शानदार कामगिरी करण्याबरोबरच संघाचे नेतृत्व देखील केले. याशिवाय त्यांनी पश्चिम रेल्वेमध्ये काम पाहाताना अनेक प्रतिभावान महिला क्रिकेटपटूंसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. तसेच भारतीय रेल्वेमध्ये पॉलिसी तयार करण्यात मोलाची मदत केली. त्या क्रिकेट प्रशासनातही काम करताना दिसल्या.
खेळाडू म्हणून एडुलजी यांनी 20 कसोटीत 404 धावा केल्या, तसेच 63 विकेट्स घेतल्या. याबरोबरच 34 वनडेत 211 धावा केल्या आणि 46 विकेट्स घेतल्या.
विरेंद्र सेहवागबद्दल सांगायचे झाले, तर तो आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये सामील होणारा भारताचा आठवा पुरुष क्रिकेटपटू आहे. यापूर्वी विनू मंकड, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, कपिल देव, बिशन सिंग बेदी आणि सुनील गावसकर यांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आलेला होता.
सेहवागने त्याच्या कारकिर्दीत 104 कसोटी सामने खेळताना 49.34 च्या सरासरीने 8,586 धावा केल्या आहेत, तसेच 40 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 251 वनडेत 35.5 च्या सरासरीने 8,273 धावा केल्या आहेत आणि 96 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 19 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 394 धावा केल्या आहेत.
याशिवाय श्रीलंकेच्या अरविंद डी सिल्वाने श्रीलंकेकडून शानदार कामगिरी केली आहे. त्याने 93 कसोटीत 42.97 च्या सरासरीने 6361 धावा केल्या आहेत. तसेच 29 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 308 वनडे सामन्यांमध्ये 34.90 च्या सरासरीने 9284 धावा केल्या आहेत. तसेच 106 विकेट्स घेतल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.