पणजी : गोव्याची (Goa) प्रमुख महिला बॅडमिंटनपटू (Badminton) तनिशा क्रास्टो हिने ओडिशाच्या ऋतूपर्णा पांडा हिच्या साथीत संघ निवड चाचणी स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद जिंकल्यानंतर या जोडीची थॉमस-उबेर कप (Thomas Uber Cup)आणि सुदिरमन कप स्पर्धेतील निवड पक्की झाली होती, त्यावर भारतीय बॅडमिंटन (Indian Badminton) संघटनेने शिक्कामोर्तब केले.
थॉमस-उबेर कप स्पर्धा डेन्मार्कमध्ये 9 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत, तर सुदिरमन कप स्पर्धा 26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत फिनलंड येथे होईल. निवड चाचणी स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे तनिशाने ऋतूपर्णाच्या साथीत दोन्ही स्पर्धांसाठी संघात स्थान मिळविले आहे.
पुरुष संघात बी. साई प्रणीत, तर महिला संघात साईना नेहवाल भारतीय संघातून खेळणार आहे. थॉमस आणि उबेर कप स्पर्धेसाठी महिला व पुरुष गटात प्रत्येकी 10 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे, तर सुदिरमन कप स्पर्धेसाठी 12 सदस्यीय संघ आहे. दोन वेळची ऑलिंपिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने अनुपलब्धता कळविल्यामुळे तिची निवड झालेली नाही, असे भारतीय बॅडमिंटन संघटनेने स्पष्ट केले आहे.
तनिशाची अव्वल कामगिरी
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हैदराबाद येथे झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत तनिशा-ऋतूपर्णा जोडीने महिला दुहेरीत अश्विनी पोनाप्पा आणि सिक्की रेड्डी या अनुभवी जोडीस साखळी फेरीत पराभवाचा धक्का दिल्यानंतर शिखा गौतम आणि अश्विनी भट या राष्ट्रीय विजेत्या जोडीस नमवून विजेतेपद मिळविले होते. त्या कामगिरीमुळे तनिशाची सीनियर संघात निवड झाली आहे. यापूर्वी तिने ज्युनियर पातळीवर भारताचे आंतरराष्ट्रीय स्पर्धांत प्रतिनिधित्व केले आहे. राष्ट्रीय ज्युनियर मिश्र दुहेरीतील ती सध्याची विजेती आहे. टॉप्स ऑलिंपिक योजनेस समावेश असलेली तनिशा एकमेव गोमंतकीय क्रीडापटू आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.