Durand Cup Football
Durand Cup Football Dainik Gomantak
क्रीडा

Durand Cup Football Tournament : ड्युरंड कप पुन्हा गोव्यात!

Kishor Petkar

पणजी : गोव्यात 2014 साली ऐतिहासिक ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धा प्रथमच झाली, त्यानंतर स्पर्धा आयोजनाने दिल्ली, कोलकाता, ईशान्य भारत असा प्रवास आखला. आता भविष्यात पुन्हा स्पर्धा गोव्यात खेळविण्याबाबत चक्रे फिरू लागली आहेत.

ड्युरँड फुटबॉल स्पर्धेतील तिन्ही करंडकांचे (ड्युरँड कप व शिमला ट्रॉफी हे फिरते, तसेच विजेत्या संघाला दिला जाणारा अध्यक्षीय करंडक) मंगळवारी दोना पावला येथे अनावरण झाले. यावेळी गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आयोजन समिती प्रमुख लेफ्टनंट जनरल के. के. रेप्सवाल, एफसी गोवाचे अध्यक्ष अक्षय टंडन, एफसी गोवाचे तांत्रिक संचालक डेरिक परेरा आदींची उपस्थिती होती.

(Durand Cup Football)

गोव्यात होऊ शकते स्पर्धा

भविष्यात संघांची संख्या वाढवून आणि स्पर्धेला अधिक वलयांकित करण्याचे नियोजन आहे आणि त्यादृष्टीने भारतीय सेनादल देशातील अन्य भागातही स्पर्धेचे आयोजन करण्याचा विचार करत असल्याचे स्पर्धा आयोजन प्रमुख लेफ्टनंट जनरल के. के. रेप्सवाल यांनी सूचीत केले. ''गोव्यात आवश्यक साधनसुविधा सज्ज असल्यास निश्चितच पुढील वर्षी स्पर्धा गोव्यात होऊ शकते'', असे ते म्हणाले.

हा धागा पकडून पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी स्पर्धा गोव्यात घेण्याचा मुद्दा अधोरेखित केला. ते म्हणाले, ''2014 नंतर पुन्हा स्पर्धा गोव्यात का होऊ शकली नाही यास कारणे असतील, पण आताचे आमचे मंत्रिमंडळ तरुण आणि खिलाडूवृत्तीचे आहे. पुढील ड्युरँड कप स्पर्धेचे सामने गोव्यात खेळले गेल्यास खूप आवडेल. यासंबंधी मी मुख्यमंत्री व क्रीडामंत्र्यांशी संवाद साधेन.''

यावेळची स्पर्धा 16 ऑगस्टपासून

जगात तिसऱ्या क्रमांकाची आणि आशियात सर्वांत जुनी असलेली 131वी ड्युरँड कप स्पर्धा येत्या 16 ऑगस्टपासून पश्चिम बंगालमधील कोलकाता, मणिपूरमधील इंफाळ आणि आसाममधील गुवाहाटी येथे खेळली जाईल. अंतिम सामना कोलकात्यातील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर 18 सप्टेंबरला होईल.

गोव्यात करंडकांचे प्रदर्शन

तिन्ही करंडक बुधवारी (ता. 3) राज्यात प्रदर्शनास ठेवले जातील. या करंडकांचा 19 जुलैपासून कोलकाता, गुवाहाटी, इंफाळ, जयपूर, गोवा असा प्रवास झाला असून गुरुवारी पुन्हा कोलकात्यास रवाना होतील.

एफसी गोवा गतविजेते

गतवर्षी कोलकात्यात झालेल्या अंतिम लढतीत मोहम्मेडन स्पोर्टिंगवर एका गोलने विजय नोंदवून एफसी गोवाने प्रथमच करंडक पटकावला होता. यंदा गोव्याचा अ गटात समावेश असून मोहम्मेडन स्पोर्टिंगविरुद्ध लढतीने 19 ऑगस्ट रोजी त्यांच्या मोहिमेला सुरवात होईल. बंगळूर एफसी, जमशेदपूर एफसी, इंडियन एअर फोर्स हे गटातील अन्य संघ आहेत.

दृष्टिक्षेपात 131वी ड्युरँड कप स्पर्धा

- स्पर्धेला आशियाई फुटबॉल महासंघाची (एएफसी) मान्यता

- यंदा एकूण 20 संघ, एकूण 47 सामने

- यावर्षी स्पर्धेत आयएसएलमधील (ISL) 11, आय-लीगमधील 5, तर सेनादलाचे 4 संघ

- पश्चिम बंगालमध्ये अ, ब गट सामने, इंफाळला क गट, तर गुवाहाटीत ड गट सामने

- बाद फेरीतील सर्व सामने पश्चिम बंगालमधील तीन मैदानांवर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT