Goa: वारंवार लांबणीवर पडलेल्या 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या (36th National Sports Competition) आयोजनासाठी गोवा (Goa) राज्य तयार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr Pramod Sawant) यांनी मंगळवारी गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या (Goa Sports Authority) आमसभेत व्यक्त केला.
मुख्यमंत्री सावंत क्रीडा प्राधिकरणाचे अध्यक्षही आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आमसभेस उपमुख्यमंत्री-क्रीडामंत्री मनोहर (बाबू) आजगावकर (Deputy CM Babu Ajgaonkar), क्रीडा सचिव जे. अशोक कुमार, गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक वसंत प्रभुदेसाई यांची, तसेच संलग्न क्रीडा संघटना प्रतिनिधींची उपस्थिती होती.
आमसभेत मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले, की ``भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) गोव्यात नियोजित असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची नवी तारीख निश्चित केल्यास यजमानपद पेलण्यास आम्ही तयार आहोत. स्पर्धा आयोजनासाठी आणि साधनसुविधा तयारीसाठी राज्य सक्षम आहे. ``
३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गतवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये गोव्यात नियोजित होती, पण कोरोना विषाणू महामारीमुळे खेळाडूंच्या आरोग्यसुरक्षा कारणास्तव स्पर्धा बेमुदत लांबणीवर टाकण्यात आली आहे. प्राप्त माहीतीनुसार, पुढील वर्षी गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होऊ शकते, पण तारखा निश्चित करताना आयओएला पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धा यामध्ये सुवर्णमध्य काढावा लागेल. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनात देशातील महामारी परिस्थिती आणि लसीकरण महत्त्वाचे ठरेल.
क्रीडा संघटनांकडून सक्रियता आवश्यक
क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी राज्यातील विविध खेळांच्या संघटनांना अधिक सक्रिय होण्याची गरज प्रतिपादली. मोजकीच सात-आठ संघटनांचा अपवाद वगळता इतर क्रीडा संघटनांचे कार्य वाढणे आवश्यक असल्याचे मत आजगावकर यांनी व्यक्त केले.
जिम्नॅस्टिक संघटनेचे निलंबन टळले
बैठकीस उपस्थित असलेल्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, गोवा जिम्नॅस्टिक असोसिएशनचे कायमस्वरूपी निलंबन टळले आहे. यासंदर्भात जिम्नॅस्टिक असोसिएशनने आवश्यक कागदपत्रे गोवा क्रीडा प्राधिकरणास सादर करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र कुस्तीतील गोवा प्रोग्रेसिव्ह रेसलिंग असोसिएशन आणि दोरीउड्या खेळातील अमेच्युअर रोप स्किपिंग असोसिएशनच्या निलंबनावर शिक्कामोर्तब झाले. आमसभेने गोवन्स हॉकी, गोवा बास्केटबॉल असोसिएश व गोवा पारंपरिक कराटे संघटनेला कायमस्वरूपी मान्यता बहाल केली.
क्रीडागुण आता गुणपत्रिकेत
शिक्षण मंडळ विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत क्रीडागुण वेगळे दाखवते. त्यामुळे त्याचा लाभ उत्तीर्ण विद्यार्थांना होत नाही. केवळ अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्याच नव्हे, तर साऱ्याच विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत क्रीडागुणांचा समावेश करण्याची मागणी आमसभेत झाली. त्यावेळी ९५ टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थांना वगळून, क्रीडागुणांचा शालेय गुणपत्रिकेत समावेश करण्याचे निर्देश मुख्यमंत्रांनी शिक्षण मंडळाच्या प्रतिनिधीस दिले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.