पणजी: गतविजेत्या स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने (Sporting Club The Goa Team) यंदाच्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील (Goa Professional League football competitions) मोहिमेची शनिवारी विजयाने सुरवात केली. पहिल्याच लढतीत पूर्ण तीन गुणांची कमाई करताना त्यांनी पणजी फुटबॉलर्सवर 3-1 फरकाने मात केली. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर (Dhuler Stadium) झाला. स्पोर्टिंग क्लब विश्रांतीला दोन गोलने आघाडीवर होता. सामन्याच्या सहाव्याच मिनिटास क्लाईव्ह मिरांडा (Clive Miranda) याच्या गोलमुळे त्यांना आघाडी मिळाली. नंतर रोहित तोटाड याने 20 व्या मिनिटास संघाच्या खाती आणखी एका गोलची भर टाकली. अकेराज मार्टिन्स याने 48 व्या मिनिटास स्पोर्टिंगची आघाडी 3-0 अशी भक्कम केल्यानंतर इरफान यादवाड याने 53 व्या मिनिटास पणजी फुटबॉलर्स पिछाडी एका गोलने कमी केली.
विश्रांतीपूर्वीच स्थिती भक्कम
स्पोर्टिंगतर्फे आजच्या लढतीत रिओ फर्नांडिस (Rio Fernandes) व लिस्टन कार्दोझ या अकादमी खेळाडूंनी सीनियर संघातून खेळताना छाप पाडली. स्पोर्टिंग क्लबच्या खाती पहिल्या गोलची भर सेटपिसेसद्वारे पडली. गिरीश नाईकच्या कॉर्नरवर मार्कुस मस्कारेन्हासचे हेडिंग पणजी फुटबॉलर्सचा गोलरक्षक प्रेस्टन रेगो याने रोखला, पण चेंडूवर ताबा राखण्यापूर्वीच रिबाऊंडवर क्लाईव्ह मिरांडाने अचूक नेम साधला. नंतर दत्तराज गावकर याने मारलेला फटका दिशाहीन ठरत असताना रोहितने चेंडू नियंत्रित केला आणि गोलरक्षक प्रेस्टनला चकवा देत स्पोर्टिंगची आघाडी भक्कम केली. यावेळी पणजी फुटबॉलर्सने केलेला ऑफसाईडचा दावा रेफरीने मान्य केला नाही. त्यानंतर मार्कुस मस्कारेन्हास चेंडूला अचूक दिशा दाखवू शकला नाही, त्यामुळे स्पोर्टिंगच्या खाती आणखी गोलची भर पडली नाही. विश्रांतीस पाच मिनिटे बाकी असताना पणजी फुटबॉलर्सला संधी होती. प्रतीक नाईकच्या असिस्टवर इरफानचा फटका गोलरक्षक ओझेन सिल्वा याने वेळीच रोखला. विश्रांतीनंतरच्या तिसऱ्याच मिनिटास अकेराज मार्टिन्सने सुरेख ड्रिबलिंग साधत पणजी फुटबॉलर्सच्या तिघा खेळाडूंना गुंगारा देत अप्रतिम गोल केला. त्यानंतर गिरीश नाईकच्या असिस्टवर इरफानने पणजी फुटबॉलर्सची पिछाडी कमी केली.
कळंगुट-मनोरा लढत आज
प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत रविवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर कळंगुट असोसिएशन व यूथ क्लब मनोरा यांच्यात सामना होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.