Goa Professional Football League: जीनो स्पोर्टस क्लबने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील पदार्पण लक्षवेधक ठरविताना शनिवारी गुणाची कमाई केली. माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सला १-१ असे गोलबरोबरीत रोखून नवोदित संघाने पहिल्याच लढतीत एक गुण प्राप्त केला.
म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झालेल्या लढतीत साहिल इनामदार याने जीनो क्लबला पेनल्टी फटक्यावर आघाडी मिळवून दिली, नंतर अखेरची १३ मिनिटे बाकी असताना बदली खेळाडू फेझर गोम्स याच्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सला बरोबरी साधता आली.
स्पर्धेतील पहिल्या लढतीत एफसी गोवा संघाला १-० असे नमविलेल्या चर्चिल ब्रदर्सचे आता दोन लढतीतून चार गुण झाले आहेत, तर पहिलाच सामना खेळणाऱ्या जीनो क्लबच्या खाती एक गुण जमा झाला.
त्यांचा गोलरक्षक अक्षत हडकोणकर सामन्याचा मानकरी ठरला. अक्षतच्या दक्षतेमुळे चर्चिल ब्रदर्सला फक्त एकाच गोलवर समाधान मानावे लागले.
विश्रांतीपूर्वी खेळात दोन्ही संघांना गोल नोंदविता आला नाही. ५३व्या मिनिटास जीनो क्लबला पेनल्टी फटका मिळाला.
चर्चिल ब्रदर्सच्या वनलालमाविया याने गोलक्षेत्रात जीनो क्लबच्या अबेलसन जाची याला पाडल्यानंतर मिळालेल्या पेनल्टी फटक्यावर साहिल याने अचूक नेम साधला.
बरोबरीसाठी वारंवार प्रयत्न केल्यानंतर चर्चिल ब्रदर्सला अखेर ७७व्या मिनिटास यश मिळाले. मॅकेन्झी फर्नांडिस याच्या भेदक क्रॉस पासवर फेझरचे हेडिंग अचूक ठरले.
रविवारचा सामना
पणजी फुटबॉलर्स विरुद्ध धेंपो स्पोर्टस क्लब
स्थळ: धुळेर-म्हापसा
वेळ : संध्याकाळी ४ वाजता
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.