37 th National Games 2023 Goa: यजमान या नात्याने गोवा ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अधिकांश खेळात भाग असेल. ४३ पैकी सात खेळांच्या संघटना आणि खेळाडू राज्यात नसल्याचे सर्व क्रीडाप्रकारांत राज्याचा सहभाग नसेल.
जास्त खेळांत सहभाग असला, तरी राज्याला एकूण किती पदके मिळतील हे सांगणे कठीण आहे, ते सारे खेळाडूंच्या हाती आहे, अशी कबुली क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी शुक्रवारी दिली.
राष्ट्रीय स्पर्धा साधनसुविधा तयारीसंदर्भातील पाहणी व त्या कामावर लक्ष ठेवण्यावर जास्त वेळ गेल्यामुळे संघांच्या तयारीबाबत वेळ देता आली नाही हे मान्य करून, आपण येत्या काही दिवसांत सर्व राज्य संघांच्या प्रशिक्षण केंद्रांना भेट देऊन पाहणी करणार आहे, तसेच स्पर्धा तयारीच्या अनुषंगाने शनिवारी (ता. ७) राज्यातील सर्व क्रीडा संघटनांची संयुक्त बैठक बोलावल्याची माहिती क्रीडामंत्री गावडे यांनी दिली.
‘‘यापूर्वीच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला पात्र ठरलेल्याच मोजक्या खेळांत सहभागी होता येत असे, परंतु आता यजमान या नात्याने गोवा अधिकांश खेळात भाग घेत आहे, आम्ही सर्वाधिक खेळाडूंना संधी दिली आहे."
"आम्ही पदके किती जिंकू हे काही मुख्यमंत्री किंवा क्रीडामंत्र्यांच्या हाती नाही. ते पूर्णपणे सहभागी खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून आहे."
"क्रीडा संघटनांनी तयारीसाठी जे काही मागितले ते सर्व आम्ही पुरविले आहे. आता राज्यासाठी अभिमानास्पद कामगिरी बजावणे पूर्णपणे सहभागी क्रीडापटूंवर अवलंबून आहे,’’ असे क्रीडामंत्री गावडे पुढे म्हणाले.
‘‘स्पर्धेचा शुभारंभ होईपर्यंत कामे होतच राहतील. एकंदरीत कामचा वेग आश्वासक आहे. स्पर्धा केंद्रांवरील कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर ही केंद्रे संबंधित खेळांसाठी दिली जातील. ३० सप्टेंबरपर्यंत कामे पूर्ण करण्याचे नियोजन होते, परंतु पावसामुळे काहीप्रमाणात विलंब झाला,’’ असे क्रीडामंत्री म्हणाले.
बॅडमिंटन आता पेडे-म्हापसा येथे
स्पर्धेच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वी १९ ऑक्टोबरपासून सांघिक व वैयक्तिक गटातील बॅडमिंटन स्पर्धा होणार आहे. अगोदर या खेळातील स्पर्धा ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये होणार होत्या, परंतु हा खेळ आता पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुलात होईल, अशी माहिती क्रीडामंत्री गावडे यांनी दिली.
‘‘एकाच वेळी विविध खेळांच्या स्पर्धा होत आहेत. त्यामुळे तयारी आवश्यक आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये इतर खेळही होतील, त्यामुळे बॅडमिंटन स्पर्धा पेडे-म्हापसा येथे नेण्याचे ठरविले. प्रत्यक्षात पेडे-म्हापसा येथील हॉल बॅडमिंटनसाठीच आहे,’’ असे क्रीडामंत्री म्हणाले.
नियोजित वेळापत्रकानुसार, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये तलवारबाजी आणि व्हॉलिबॉल हे खेळही खेळले जातील. सध्या या स्टेडियमच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून १९ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याबाबत साशंकता आहे.
क्रीडा संघटना, महासंघाबाबत निर्णय ‘आयओए’चा
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या क्रीडा संघटना, राष्ट्रीय महासंघ मान्यता, त्यांच्या संघांना प्रवेश याबाबतचे निर्णय भारतीय ऑलिंपिक संघटना (आयओए) घेणार असल्याचेही क्रीडामंत्री गावडे यांनी स्पष्ट केले. गोव्यातील क्रीडा संघटनांसदर्भात योग्य तोडगा काढण्यास प्राधान्य देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.