37th National Games meeting held  Dainik Gomantak
क्रीडा

37th National Games: गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ठरल्यानुसारच; स्पर्धा तांत्रिक आचार समितीला विश्वास

किशोर पेटकर

Goa to Host 37th National Games: गोव्यात यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नियोजित असलेली ३७वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ठरल्यानुसारच होईल, असा ठाम विश्वास शनिवारी भारतीय ऑलिंपिक समितीच्या (आयओए) राष्ट्रीय स्पर्धा तांत्रिक आचार समितीचे (जीटीसीसी) अध्यक्ष अमिताभ शर्मा यांनी प्रकट केला.

मात्र स्पर्धा तयारीच्या सध्याच्या वेगाबाबत गोवा ऑलिंपिक संघटनेचे (जीओए) सचिव गुरुदत्त भक्ता यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.

बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवरली गोवा क्रीडा प्राधिकरण सभागृहात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनासंदर्भात शनिवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली.

यावेळी क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालक गीता नागवेकर, तसेच विविध राज्य क्रीडा संघटनांचे अध्यक्ष-सचिव यांची उपस्थिती होती.

अमिताभ शर्मा यांनी सांगितले, की ‘‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे ठरल्यानुसार उद्‍घाटन २५ ऑक्टोबरला आणि ९ नोव्हेंबर रोजी समारोप सोहळा होईल. स्पर्धेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्धारित कालावधीत तयार होतील.

सर्व स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी ३० सप्टेंबर ही अंतिम तारीख आहे. स्पर्धेसाठी आता नवीन स्टेडियम बांधले जाणार नसून, नूतनीकरणाचे काम सुरू आहे आणि या कामांच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जात आहे.’’

स्पर्धेतील सहभागींसाठी प्रवेश नोंदणी प्रक्रिया प्रणाली लवकरच ऑनलाईन पद्धतीने सुरू होईल आणि स्पर्धा सुरू होण्यास तीस दिवसअगोरपर्यंत अंतिम मुदत राहील. यामुळे नोंदणी प्रक्रिया सूरळीत व पद्धतशीरपणे होईल, असे अमिताभ यांनी स्पष्ट केले.

प्रमुख क्रीडापटूंची उपस्थिती अपेक्षित

गोव्यातील ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत देशातील प्रमुख खेळाडूंना निमंत्रित केले जाईल, यामध्ये मिराबाई चानू, नीरज चोप्रा, निखत झरीन, पी. व्ही. सिंधू या ऑलिंपियन खेळाडूंचा समावेश असेल, तसेच देशातील नावाजलेले क्रीडापटू स्पर्धेत सहभागी होण्याचा विश्वास असल्याचे अमिताभ शर्मा यांनी बैठकीत नमूद केले.

क्रीडा संघटनांसाठी निधी मंजूर

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सहभागी खेळांच्या संघटनांना प्रशिक्षण शिबिरे घेण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक निधीस मंजुरी दिली असल्याची माहिती गीता नागवेकर यांनी बैठकीत दिली. हा निधी उपलब्ध झाल्यामुळे आवश्यक क्रीडा उपकरणांसह प्रशिक्षण शिबिरे घेणे शक्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रलंबित कामे वक्तशीरपणे होणे गरजेचे ः भक्ता

गोवा ऑलिंपिक संघटनेचे सचिव गुरुदत्त भक्ता यांनी बैठकीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या सध्याच्या कामाची गती चिंताजनक असल्याचे मत बैठकीत व्यक्त करून तीव्र नापसंती व्यक्त केली. स्पर्धेसंदर्भात सर्व प्रलंबित कामे वेगाने वक्तशीरपणे पूर्ण होण्याची गरज त्यांनी प्रतिपादली.

‘स्पर्धा यशस्वीपणे पार पडणे महत्त्वाचे आहे. सध्याची वस्तुस्थिती प्रतिकुल आहे. स्पर्धा आयोजनात दोष राहिले, तर त्याचे खापर गोवा सरकार व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर फोडणे आम्हाला अजिबात आवडणार नाही. कामे वेळेत पूर्ण करून घेण्याची जबाबदारी भारतीय ऑलिंपिक संघटनेची आहे.

राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांनी योग्य माहिती दिलेली नाही. लुसोफोनिया स्पर्धेच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्यात वारसा निर्मिती केली, मात्र राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने सध्या राज्यात तसे घडत नाही.

राष्ट्रीय स्पर्धा क्रीडानगरीस बगल देण्यात आली. भारतीय ऑलिंपिक संघटनेकडून फक्त तोंडी आश्वासने आणि हमीच मिळत आहे,’’ असे बैठकीनंतर भक्ता यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.

संदीप वरळीकरांची उपस्थिती खटकली

गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सेवेतील वादग्रस्त प्रशिक्षक संदीप वरळीकर यांची आदेशान्वये क्रीडामंत्री गोविंद गावडे यांचे सल्लागार म्हणून उचलबांगडी करण्यात आली आहे, तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कार्यकारी अधिकारी यांचे समन्वयक म्हणूनही हकालपट्टी करण्यात आली आहे.

हा आदेश १६ ऑगस्टच्या तारखेने असूनही वरळीकर शनिवारच्या बैठकीस इतिवृत्त लिहिण्यासाठी उपस्थित होते. काही राज्य क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना वरळीकर यांची उपस्थिती खटकली.

‘‘गोवा क्रीडा प्राधिकरणाने आदेशान्वये संदीप वरळीकर यांची काढले आहे, तरीही ते बैठकीस उपस्थित राहिले हे योग्य नव्हे. त्यांच्या जागी संबंधित कामासाठी त्वरित दुसरा अधिकारी प्राधिकरणाने नियुक्त करायला हवा,’’ असे एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने बैठकीनंतर सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT