Goa: आगामी राज्य विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election 2022) संबंधित कामासाठी कांपाल येथील इनडोअर स्टेडियम (Campal Indoor Stadium) वापरण्याचा बेत अखेर सरकारला बदलावा लागला. क्रीडापटू, क्रीडा संघटनांच्या वाढत्या विरोधाची दखल घेत निवडणूक ईव्हीएम मशीन चाचणी प्रक्रिया अन्यत्र घेण्याचा निर्णय प्रशासनाने गुरुवारी घेतला, त्यामुळे कांपाल स्टेडियम आता क्रीडापटूंसाठी बंद होणार नसल्याचे निश्चित झाले.
निवडणूक कारणास्तव कांपाल येथील इनडोअर स्टेडियम दीर्घ काळासाठी आरक्षित करण्यास बॅडमिंटन, टेबल टेनिस आदी क्रीडा संघटनांनी आक्षेप घेतला होता. गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव संदीप हेबळे यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत. क्रीडामंत्री मनोहर (बाबू) आजगावकर, राज्य क्रीडा सचिव, क्रीडा व युवा व्यवहार खात्याचे संचालक, गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक यांना पत्र लिहून क्रीडापटूंच्या संभाव्य गैरसोयीकडे लक्ष वेधले होते.
उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी (2) मामू हागे यांनी गुरुवारी आदेश जारी केला असून त्यानुसार, ईव्हीएम-व्हीव्हीपीएटी या निवडणूकविषयक यंत्रणेची पहिल्या टप्प्यातील चाचणी आल्तिनो-पणजी येथील सरकारी पॉलिटेक्निकच्या जिमखाना सभागृहात 26 ऑक्टोबरपासून होणार आहे. या संदर्भात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यासही माहिती देण्यात आली आहे.
कोविड-19 निर्बंधांमुळे राज्यातील इनडोअर स्टेडियम दीर्घकाळ बंद होती, हल्लीच पुन्हा स्टेडियमचा वापर क्रीडा सराव, स्पर्धांसाठी सुरु झाला. निवडणूक कामासाठी पुन्हा इनडोअर स्टेडियम बंद केल्यास क्रीडापटूंचे अतोनात नुकसान झाले असते. ही बाब हेबळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात अधोरेखित केली होती. निवडणूक प्रक्रियेनिमित्त दीर्घकाळ इनडोअर स्टेडियम संबंधित यंत्रणेच्या ताब्यात राहण्याची शक्यता हेबळे यांनी व्यक्त केली होती.
‘‘ क्रीडापटूंसह साऱ्यांनी कांपाल इनडोअर स्टेडियम निवडणूक कामासाठी आरक्षित करण्यास जोरदार विरोध प्रदर्शित केला, जागा बदलण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चाही केली. त्याबद्दल साऱ्यांचे आभार. ’’
- संदीप हेबळे, सचिव गोवा बॅडमिंटन असोसिएशन
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.