Ranji Trophy Dainik Gomantak
क्रीडा

Ranji Trophy : यंदाच्या रणजी मोसमातील गोव्याचा पहिला विजय; केरळवर 7 गड्यांनी मात

शतक-अर्धशतकासह ईशान सामनावीर

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्याने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील यंदाच्या मोसमातील पहिला विजय नोंदविताना केरळला दशकभरानंतर नमविण्याची किमया साधली. त्यांनी सामना 7 विकेट राखून जिंकला. पदार्पणात पहिल्या डावात शतक आणि नंतर फिरक घेणाऱ्या खेळपट्टीवर 155 धावांचे लक्ष्य गाठताना प्रेक्षणीय नाबाद अर्धशतक केलेला ईशान गडेकर सामन्याचा मानकरी ठरला.

केरळमधील थुम्बा येथे झालेल्या या सामन्यात शुक्रवारी यजमान संघाचा पराभव झाला, त्यामुळे त्यांच्या बाद फेरी गाठण्याच्या प्रयत्नांनाही धक्का बसला. क गटात बंगळूर येथे कर्नाटकने छत्तीसगडला नमविले, त्यामुळे त्यांचे सर्वाधिक 19 गुण झाले आहेत. त्या खालोखाल राजस्थानचे 14 गुण असून छत्तीसगड व केरळचे प्रत्येकी 13 गुण कायम राहिले. अगोदरचे तीन सामने अनिर्णित राखल्यानंतर विजयाचे सहा गुण प्राप्त करत गोवा 11 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. त्यानंतर झारखंडचे 10, सेनादलाचे सात गुण असून पुदुचेरीस चारही सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. गोव्याचा पुढील सामना येत्या मंगळवारपासून (ता. 10) पर्वरी येथे पुदुचेरीविरुद्ध होईल. गोव्याने 2013 नंतर प्रथमच रणजी क्रिकेट स्पर्धेत केरळला नमविले.

ईशानची मॅचविनिंग फलंदाजी

सलामीच्या 25 वर्षीय ईशानने पहिल्या डावात 105 धावा केल्या होत्या. केरळच्या फिरकी माऱ्यासमोर सामन्याच्या चौथ्या दिवशी फलंदाजी अवघडच होती, पण ईशान कसलेल्या फलंदाजाप्रमाणे खेळला. त्याने 136 चेंडूंत चार चौकार व एका षटकाराच्या मदतीने नाबाद 67 धावा केल्या. सिद्धेश लाड (33) याच्यासमवेत चौथ्या विकेटसाठी 68 धावांची अभेद्य भागीदारी करून दिवसातील एक सत्र बाकी असताना संघाचा विजय साकारला. गोव्याने 3 बाद 157 धावा केल्या. ईशानचे कौतुक करताना गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ याने सामन्यानंतर सांगितले, की ‘‘दोन्ही डावात ईशानने खूप चांगली फलंदाजी केली. तो पदार्पण करणारा नवोदित वाटलाच नाही, अनुभवी फलंदाजाप्रमाणे शांतपणे खेळला. त्यामुळे संघाचे काम सोपे झाले, विशेषतः दुसऱ्या डावातील त्याची फलंदाजी समयोचित ठरली.’’

मोहितने प्रतिस्पर्ध्यांना गुंडाळले

गोव्याने पहिल्या डावात 46 धावांची आघाडी घेतली होती. केरळने दुसऱ्या डावात गुरुवारी तिसऱ्या दिवसअखेर 6 बाद 172 धावा केल्या होत्या. शुक्रवारी सकाळी 7.3 षटकांत 28 धावांत त्यांनी बाकी चार गडी गमावले. त्यामुळे त्यांचा डाव 200 धावांत संपुष्टात आला. ऑफस्पिनर मोहित रेडकरने छान मारा केला. यंदा मोसमात दुसऱ्यांदा डावात 5 गडी बाद करताना त्याने 73 धावांत 6 गडी टिपून चार रणजी सामन्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविली. त्याने जलज सक्सेनाला पायचीत बाद करून जोडी फोडली. त्यानंतर 70 धावा केलेल्या अनुभवी रोहन प्रेमला त्रिफळाचीत बाद केले, पुढच्याच चेंडूवर बासिल थम्पी याच्या यष्ट्यांच्या वेध घेतला, मात्र एन. पी. बासिल याने मोहितला हॅटट्रिक साधू दिली नाही. ‘‘केरळने खेळपट्टीचा लाभ घेण्यासाठी दोन ऑफस्पिनर खेळविले, पण डाव त्यांच्यावरच उलटला. मोहितने कल्पक फिरकी मारा केला. दुसऱ्या डावात त्याने केरळाचा डाव लांबणार नाही याची दक्षता घेतली. त्यामुळे आम्हाला आव्हानात्मक खेळपट्टीवर विजयासाठी मोठे आव्हान मिळाले नाही,’’ असे कर्णधार दर्शनने मोहितच्या कामगिरीविषयी सांगितले.

पहिल्या डावातील आघाडी निर्णायक

पहिल्या डावात केरळला 265 धावांत रोखताना सामन्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात वेगवानद्वयी लक्षय गर्ग व अर्जुन तेंडुलकर यांनी अफलातून मारा केला. नंतर ईशान गडेकरचे शतक, तळाच्या फलंदाजांनी लढविलेला किल्ला यामुळे गोव्याला महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली आणि विजयी कामगिरीत 46 धावांचे आधिक्य निर्णायक ठरले, असे मत दर्शनने व्यक्त केले. ‘‘आमचा संघ सामन्याच्या चारही दिवस उत्तम क्रिकेट खेळला. गोवा क्रिकेट असोसिएशनकडून आणि विशेषतः सचिव रोहन गावस देसाई यांच्याकडून भरीव प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे खेळाडूंचा उत्साह बळावला आहे आणि त्याद्वारे सुरेख सांघिक कामगिरी मैदानावर प्रदर्शित होत आहे,’’ असे दर्शन संघाच्या एकंदरीत कामगिरीविषयी म्हणाला.

संक्षिप्त धावफलक

केरळ, पहिला डाव : 265 व दुसरा डाव (6 बाद 172वरून) : 62.3 षटकांत सर्वबाद 200 (रोहन प्रेम 70, जलज सक्सेना 34, एन. पी. बासिल नाबाद 16, लक्षय गर्ग 9-0-41-1, अर्जुन तेंडुलकर 3-0-10-0, दर्शन मिसाळ 13.3-1-42-1, मोहित रेडकर 22-4-73-6, शुभम देसाई 14-1-26-2, सिद्धेश लाड 1-0-1-0) पराभूत वि. गोवा, पहिला डाव : 311 व दुसरा डाव : 48.3 षटकांत 3बाद 157 (अमोघ देसाई 23, ईशान गडेकर नाबाद 67, सुयश प्रभुदेसाई 14, स्नेहल कवठणकर 13, सिद्धेश लाड नाबाद 33, जलज सक्सेना 1-53, सिजोमॉन जोसेफ 1-47, वैशाख चंद्रन 1-31).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

SCROLL FOR NEXT