ICC ODI Cricket World Cup 2023, Australia vs Afghanistan, Glenn Maxwell Double Century Records:
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत मंगळवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान संघात सामना पार पडला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३ विकेट्सने विजय मिळवला.
या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने द्विशतक ठोकत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. महत्त्वाचे म्हणजे ऑस्ट्रेलियाने या विजयासह उपांत्य फेरीतही स्थान मिळवले आहे.
या सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर 292 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मॅक्सवेलने कर्णधार पॅट कमिन्सबरोबर आठव्या विकेटसाठी 202 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला 47 व्या षटकात विजय मिळवून दिला.
मॅक्सवेल 128 चेंडूत 201 धावांवर नाबाद राहिला. या खेळीत त्याने 21 चौकार आणि 10 षटकार मारले. या खेळीसह मॅक्सवेलने अनेक विक्रम केले आहेत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की मॅक्सवेलने अनेक विक्रमही रचले आहेत.
ग्लेन मॅक्सवले हा धावांचा पाठलाग करताना वनडेत वैयक्तिक सर्वोच्च धावांची खेळी करणारा क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी कोणालाही वनडेत धावांचा पाठलाग करताना द्विशतक करता आले नव्हते.
यापूर्वी धावांचा पाठलाग करताना सर्वोच्च धावांची खेळी करण्याचा विक्रम फखर जमानच्या नावावर होता. फखरने 2021 मध्ये जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 193 धावांची खेळी केली होती.
तसेच मॅक्सवेल वनडेत ऑस्ट्रेलियाकडूनही सर्वोच्च धावांची खेळी करणारा क्रिकेटपटू ठरला आहे. तो ऑस्ट्रेलियाचा वनडेतील पहिला द्विशतकवीर ठरला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाकडून सर्वोच्च धावांची जिखेळी करण्याचा विक्रम शेन वॉटसनच्या नावावर होता. त्याने बांगलादेशविरुद्ध 2011 मध्ये मीरपूरला नाबाद 185 धावांची खेळी केली होती.
इतकेच नाही तर मॅक्सवेल असा पहिलाच फलंदाज आहे, ज्याने सलामीला न खेळताही वनडेत द्विशतक केले आहे. यापूर्वी असे कोणालाही करता आले नव्हते.
ग्लेन वनडे वर्ल्डकपमध्ये द्विशतक करणारा मार्टिन गप्टील आणि ख्रिस गेल यांच्यानंतरचा तिसराच फलंदाज ठरला आहे.
न्यूझीलंडच्या गप्टीलने 2015 वनडे वर्ल्डकपमध्ये वेलिंग्टनला वेस्ट इंडिजविरुद्ध 237 धावांची खेळी केली होती. तसेच वेस्ट इंडिजच्या गेलने 2015 वनडे वर्ल्डकपमध्येच झिम्बाब्वेविरुद्ध कॅनबेराला 215 धावांची खेळी केली होती.
मॅक्सवेलने हे द्विशतक 128 चेंडूतच पूर्ण केले होते. त्यामुळे तो चेंडूंच्या तुलनेत वनडेत सर्वात जलद द्विशतक करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे.
या यादीत अव्वल क्रमांकावर इशान किशन आहे. त्याने 126 चेंडूत बांगलादेशविरुद्ध चितगावला 2022 साली झालेल्या वनडेत द्विशतक केले होते.
तसेच या विक्रमाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ख्रिस गेल असून त्याने 2015 वनडे वर्ल्डकपमध्येच झिम्बाब्वेविरुद्ध कॅनबेराला 138 चेंडूत द्विशतकी खेळी केली होती.
वनडे क्रिकेटमध्ये 8 व्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी करण्याचा विश्वविक्रमही मॅक्सवेल आणि कमिन्सने केला आहे. वनडेत 8 व्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी करणारी या दोघांची पहिली जोडी ठरली आहे.
वनडे क्रिकेटमध्ये 7 किंवा त्याखालील विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी करणाऱ्या जोड्यांमध्ये आता मॅक्सवेल आणि कमिन्स यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जोस बटलर आणि आदिल राशीद यांची जोडी आहे. त्यांनी 2015 साली बर्मिंगघमला न्यूझीलंडविरुद्ध 7 व्या विकेटसाठी 177 धावांची भागीदारी केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.