India vs Sri Lanka ANI
क्रीडा

IND vs SL: विराट, गिल, अय्यरची फलंदाजी ते वेगवान आक्रमण; भारताच्या श्रीलंकेविरुद्ध विजयाची 5 कारणे

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Sri Lanka: भारत विरुद्ध श्रीलंका संघात गुरुवारी (2 नोव्हेंबर) वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील सामना पार पडला. वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने 302 धावांनी विजय मिळवला. हा भारताचा सलग सातवा विजय होता. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

या सामन्यात भारताने श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 357 धावा केल्या होत्या. त्यानंतर 358 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 19.4 षटकात 55 धावा करून सर्वबाद झाला. दरम्यान, भारताच्या या विजयामागील कारणांचा आढावा घेऊ.

नाणेफेक गमावणे ठरले फायद्याचे

या स्पर्धेत श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारताच्या फायद्याचा ठरला. कारण वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळाली.

विशेष म्हणजे नाणेफेक गमावल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने याबद्दल उल्लेखही केला होता. त्याने म्हटले होते की भारताला प्रथम फलंदाजीच करायची होती. कारण नंतर वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल.

विराट, गिल अन् श्रेयसची दमदार फलंदाजी

प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्माची विकेट दुसऱ्याच चेंडूवर 4 धावांवर गमावली होती. त्यानंतर मात्र, शुभमन गिल आणि विराट कोहली या दोघांनीही शानदार खेळ केला.

या दोघांनीही श्रीलंकन गोलंदाजांना वरचढ होऊ दिले नाही. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी तब्बल 189 धावांची भागीदारी केली. पण हे दोघेही शतकाच्या जवळ असताना बाद झाले. गिल 92 धावांवर आणि विराट 88 धावांवर माघारी परतला.

परंतु, त्यानंतर श्रेयस अय्यरने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेत आक्रमक खेळ केला. त्याने 56 चेंडूतच 82 धावांची खेळी केली. ही खेळी करताना त्याने आधी केएल राहुलबरोबर (21) 60 धावांची आणि रविंद्र जडेजाबरोबर (35) 57 धावांची भागीदारी केली. या तिघांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताला 357 धावसंख्या गाठली.

बुमराह-सिराजची शानदार सुरुवात

श्रीलंका संघ 358 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरल्यानंतर जसप्रीत बुमराहने भारताला स्वप्नवत सुरुवात करून दिली. त्याने डावाच्या पहिल्याच चेंडूवर पाथम निसंकाला बाद केले होते.

त्यानंतर मोहम्मद सिराजच्या सुरुवातीच्या स्पेलमध्ये श्रीलंकेची वरची फळी पूर्णपणे फसली. त्याने दुसऱ्याच षटकात दिमुथ करुणारत्ने आणि सदिरा समरविक्रमा यांना माघारी धाडले, त्यापाठोपाठ चौथ्या षटकात त्याने श्रीलंकेचा कर्णधार कुशल मेंडिसलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळे श्रीलंकेची अवस्था 4 बाद 3 धावा अशी दयनीय झाली होती.

शमीचा पुन्हा पंजा

बुमराह-सिराजने दिलेल्या धक्क्यामधून श्रीलंकेचा संघ नंतर सावरूच शकला नाही. त्यातच नंतर मोहम्मद शमीने श्रीलंकेला आणखी संघर्ष करायला लावला.

त्याने श्रीलंकेची मधली आणि तळातली फलंदाजी उद्ध्वस्त करत श्रीलंकेला प्रत्येक धावेसाठी प्रयत्न करायला लावले. त्याच्या पाचच षटकांमध्ये 18 धावा देत त्याने 5 विकेट्स घेतल्या.

शमीची या वर्ल्डकपमध्ये पाच विकेट्स घेण्याची ही दुसरी वेळ आहे. तसेच त्याने अवघ्या 3 सामन्यातच 14 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.

क्षेत्ररक्षकांचेही योगदान

भारताच्या क्षेत्ररक्षकांनीही या सामन्यात मोलाचे योगदान दिले. तसेच यष्टीरक्षक केएल राहुलचे यष्टीरक्षणही महत्त्वाचे ठरले. त्याने धावा रोखण्याबरोबरच दोन झेल घेतले. त्याचबरोबर श्रीलंकेच्या 10 फलंदाजांपैकी 6 फलंदाज झेलबाद झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT