FC Goa: संघात केवळ एक परदेशी आणि नवोदितांवर भर दिलेल्या एफसी गोवा संघाने मंगळवारी ड्युरँड कप फुटबॉल (Durand Cup Football) स्पर्धेत विजयी सलामी दिली. कोलकाता (Kolkata) येथील विवेकानंद युबा भारती क्रीडांगणावर त्यांनी आर्मी ग्रीन संघाला 2-0 फरकाने हरविले.
सामन्याच्या 35व्या मिनिटास स्पॅनिश खेळाडू (Spanish Footballer) आल्बर्टो नोगेरा याने पहिला गोल केल्यानंतर देवेंद्र मुरगावकर याने 59व्या मिनिटास संघाची आघाडी भक्कम केली. एफसी गोवाचा पुढील सामना येत्या सोमवारी (ता. 13) सुदेवा दिल्ली एफसी संघाविरुद्ध होईल. सध्या या गटात एफसी गोवा व जमशेदपूर एफसी संघाचे प्रत्येकी तीन गुण आहेत.
अर्ध्यातासाच्या खेळानंतर एफसी गोवाने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. माकन चोथे आणि नोगेरा यांच्यातील सुरेख समन्वयामुळे गोल झाला. स्पॅनिश खेळाडूने आर्मी ग्रीन संघाचा बचाव भेदला आणि नंतर जागा सोडलेला गोलरक्षक सरथ नारायणन यालाही बेसावध ठरविले. विश्रांतीला पाच मिनिटे बाकी असताना देवेंद्र मुरगावकरला गोल नोंदविण्याची संधी होती, परंतु त्याचा फटका गोलरक्षकाने वेळीच रोखला.
उत्तरार्धात प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी ग्लॅन मार्टिन्स व अलेक्झांडर रोमारियो जेसूराज या अनुभवी, तसेच नवोदित महंमद नेमिल यांना मैदानात पाठविले. तासाभराच्या खेळास एक मिनिट बाकी असताना देवेंद्रने लक्ष्य साधले. मैदानाच्या उजव्या बाजूने रोमारियो याने मेहनत घेतली आणि नंतर पुढे आलेल्या देवेंद्रला गोल करण्यास साह्य केले.
- पापुईया व ख्रिस्ती डेव्हिस यांचे एफसी गोवा सीनियर संघात पदार्पण
- प्रिन्सटन रिबेलो याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी
- सुरवातीच्या संघात स्पेनचा आल्बर्टो नोगेरा हा एकमेव परदेशी खेळाडू
- उत्तरार्धात महंमद नेमिल याला संधी, एफसी गोवाकडून पहिला सामना
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.