Devdutt Padikkal | India vs England Instagram
क्रीडा

IND vs ENG: केएल राहुलच्या जागेवर संधी मिळालेला पडिक्कल करणार कसोटी पदार्पण? अशी आहे कामगिरी

Devdutt Padikkal Performance: इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात देवदत्त पडिक्कलला केएल राहुलचा बदली खेळाडू म्हणून संधी मिळाली आहे, त्याची आत्तापर्यंतची कामगिरी कशी राहिली, याचा घेतलेला आढावा.

Pranali Kodre

Devdutt Padikkal replace KL Rahul in Team India for 3rd Test against England:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटला 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

भारताचा अनुभवी फलंदाज केएल राहुल तिसऱ्या सामन्यासाठी पूर्ण तंदुरुस्त झालेला नाही, त्यामुळे तो या सामन्यातून बाहेर झाला आहे. याबद्दल बीसीसीआयने माहिती दिली आहे.

त्यामुळे केएल राहुलच्या ऐवजी तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात निवड समितीने बदली खेळाडूची निवड केली आहे. कर्नाटकचा 23 वर्षीय फलंदाज देवदत्त पडिक्कलला भारतीय संघात केएल राहुलच्या जागेवर संधी देण्यात आली आहे.

पडिक्कल सध्या तुफान फॉर्ममध्ये खेळत आहे. खरंतर पडिक्कलने 2021 मध्येच भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने श्रीलंकेविरुद्ध दोन टी20 सामने खेळले होते. त्यात त्याला 38 धावाच करता आल्या. त्यानंतर त्याला भारतीय संघात संधी मिळाली नव्हती.

खरंतर 2022 हे वर्ष त्याच्यासाठी खडतर राहिले होते. तो बराचकाळ आजारी होता. त्यामुळे त्याला त्यावर्षी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धाही खेळता आली नाही. तसेच रणजी ट्रॉफीमध्येही तो पाच सामन्यात 260 धावाच करू शकला.

इतकेच नाही, तर आयपीएल 2023 मध्येही राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने संघर्ष केला. त्यातच देवधर ट्रॉफीदरम्यान त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. साधारण वर्षभराच्या संघर्षानंतर मात्र त्याने क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केले.

त्याने विजय हजारे ट्रॉफी 2023-24 स्पर्धेत 5 सामन्यात 155 च्या सरासरीने 2 शतके आणि 3 अर्धशतकांसह 465 धावा केल्या. त्यानंतर सुरू झालेल्या रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धेत त्याने आत्तापर्यंत 4 सामन्यातील 6 डावात 92.66 च्या सरासरीने 3 शतकांसह 556 धावा केल्या आहेत.

पडिक्कलने नुकताच 9 ते 12 फेब्रुवारीदरम्यान तमिळनाडूविरुद्ध चेन्नईमध्ये झालेल्या रणजी सामन्यात 218 चेंडूत 12 चौकार आणि 6 षटकारांसह 151 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे हा सामना पाहाण्यासाठी भारतीय संघाच्या निवड समीतीचे अध्यक्ष अजीत अगरकर स्टेडियममध्ये उपस्थित होते.

पडिक्कलने रणजी ट्रॉफी चालू असताना इंग्लंड अ संघाविरुद्धची प्रथम श्रेणी सामने खेळले.त्याने भारतीय अ संघाकडून इंग्लंड अ संघाविरुद्धच्या दोन प्रथम श्रेणी सामन्यात खेळताना 105, 65 आणि 21 अशा धावांच्या खेळी केल्या होत्या.

एकूणच पडिक्कलचा सध्याचा फॉर्म पाहाता, त्याला त्याचे बक्षीस मिळाले. आता त्याला भारतीय संघाकडून कसोटीत पदार्पण करण्याचीही संधी मिळू शकते.

पडिक्कलचे सामने

पडिक्कलने आत्तापर्यंत 31 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 44.54 च्या सरासरीने 2227 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 6 शतकांचा आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच त्याने लिस्ट ए क्रिकेटचे 30 सामने खेळले असून यात 81.52 च्या सरासरीने आणि 8 शतके व 11 अर्धशतकांसह 1875 धावा केल्या आहेत. त्याने 92 टी20 सामने खेळताना 3 शतकांसह 2768 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT