WPL 2023: रविवारी वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात ब्रबॉर्न स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात दिल्लीने 60 धावांनी विजय मिळवत स्पर्धेची विजयी सुरुवात देखील केली. याच सामन्यादरम्यान युवा क्रिकेटपटू जेमिमाह रोड्रिग्जने तिच्यातील नृत्याचे कौशल्यही दाखवले.
रविवारी बेंगलोर विरुद्ध बाऊंड्री लाईनजवळ क्षेत्ररक्षण करत असताना दिल्ली कॅपिटल्सची उपकर्णधार जेमिमाह रोड्रिग्ज चाहत्यांचे मनोरंजन देखील करताना दिसली. तिने यादरम्यान काही डान्स मुव्हज केल्या. ती डान्स करत असताना काही चाहत्यांनी टीपले असून आता तिचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
जेमिमाहनेही त्यातील काही व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर रिपोस्ट केले आहेत. तिच्या या व्हिडिओंना चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंतीही मिळत आहे.
जेमिमाहने चाहत्यांचे मनोरंजन करणे तसे नवीन नाही. ती यापूर्वी अनेकदा तिच्या वेगवेगळ्या व्हिडिओमधून चाहत्यांचे मनोरंजन करत असते. अनेकदा तिचे गिटार वाजवतानाचे, गाणे म्हणतानाचे किंवा डान्स करतानाचेही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. तसेच अनेकदा ती संघसहकाऱ्यांबरोबर मस्ती करतानाही दिसली आहे.
दरम्यान, या सामन्यात जेमिमाहकडून चांगली कामगिरीही पाहायला मिळाली. या सामन्यात बेंगलोरची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण दिल्लीकडून कर्णधार मेग लॅनिंग आणि शफाली वर्मा यांनी 162 धावांची सलामी भागीदारी करत बेंगलोरला बॅकफूटवर ढकलले होते.
या दोघीही बाद झाल्यानंतर मॅरिझेन काप आणि जेमिमाहने दिल्लीच्या डावाची जबाबदारी स्विकारली. या दोघींनी 31 चेंडूत नाबाद 60 धावांची तिसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचली. मॅरिझेन कापने 17 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह 39 धावांची नाबाद खेळी केली, तर जेमिमाहने 3 चौकारांच्या मदतीने 15 चेंडूत 22 धावांची नाबाद खेळी केली.
त्यामुळे दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 बाद 223 धावा उभारल्या. त्यानंतर 224 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरला 20 षटकात 8 बाद 163 धावाच करता आल्या. त्यामुळे दिल्लीने सहज विजय मिळवला. दिल्लीकडून तारा नॉरिसने 5 विकेट्स घेतल्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.