Indian Super League Football: एफसी गोवा संघासाठी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेची प्ले-ऑफ फेरी गाठण्यासाठी विजयच हवा होता, पण बंगळूर एफसीच्या अष्टपैलू खेळासमोर त्यांना ते शक्य झाले नाही.
चुकांची पुनरावृत्ती झाल्यामुळे गोव्यातील संघाची मोहीम साखळी फेरीतच संपुष्टात आली, तर ओडिशा एफसी पुढील फेरी गाठणारा सहावा संघ ठरला.
बंगळूर येथे गुरुवारी रात्री झालेल्या लढतीत बंगळूर एफसीने सलग आठवा विजय नोंदवून आयएसएल स्पर्धेत नवा विक्रम रचला. घरच्या मैदानावर त्यांनी ३-१ असा सफाईदार विजय नोंदवून गुणतक्त्यात तिसरा क्रमांकही मिळविला. २१ वर्षीय शिवा नारायणन याने दोन गोल केले.
सहाव्या मिनिटानंतर ७६व्या मिनिटास त्याने चेंडूला गोलनेटची दिशा दाखविली. दुसऱ्या गोलच्या वेळेस एफसी गोवाच्या खेळाडूंनी ऑफ-साईड गोलचा दावा करत हुज्जत घातली, पण रेफरीने तो अमान्य केला. एफसी गोवाच्या सहाय्यक प्रशिक्षकास रेड कार्डही मिळाले.
बंगळूरचा तिसरा गोल बदली खेळाडू पाब्लो पेरेझ याने ८१व्या मिनिटास केला. एफसी गोवाचा एकमात्र गोल इकेर ग्वोर्रोचेना याने ३३व्या मिनिटास नोंदविला.
ओडिशा एफसीची आगेकूच
बुधवारी जमशेदपूरने नमविल्यामुळे ओडिशा संघ अधांतरी होता, पण गुरुवारी एफसी गोवा पराजित झाल्यामुळे जोसेप गोम्बाऊ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाची आगेकूच निश्चित झाली. ३० गुणांसह ओडिशाने सहावा क्रमांक मिळविला आणि प्ले-ऑफ फेरीतील अखेरची जागा मिळाली.
बंगळूरचा हा अकरावा विजय ठरला. त्यामुळे २० लढतीनंतर त्यांचे ३४ गुण झाले व तिसरा क्रमांक मिळाला. स्पर्धेतील सलग तिसरा आणि एकंदरीत नववा पराभव पत्करल्यामुळे एफसी गोवा संघ २० लढतीनंतर २७ गुणांसह सातव्या क्रमांकावर कायम राहिला.
एफसी गोवाने स्वीकारले ३५ गोल
एफसी गोवाने आयएलएल मोहिमेत यंदा ३५ गोल नोंदविले. स्पर्धेच्या गुणतक्त्यातील पहिल्या नऊ संघांतील ही निकृष्ट कामगिरी ठरली. मुंबई सिटी (५४ गोल) संघानंतर दुसऱ्या क्रमांकाचे ३६ गोल एफसी गोवाने नोंदविले, पण कमजोर बचावामुळे त्यांची ही कामगिरी झाकोळली गेली.
दृष्टिक्षेपात...
बंगळूर एफसीतर्फे सलग ८ विजयांचा आयएसएल विक्रम
जमशेदपूरचा २०२१-२२ मोसमातील सलग ७ विजयांचा विक्रम मोडला
बंगळूर येथे एफसी गोवाचे ओळीने ४ पराभव
एफसी गोवाविरुद्ध १३ आयएसएल लढतीत बंगळूरचे ७ विजय
पहिल्या टप्प्यात बंगळूरची एफसी गोवावर २-० अशी मात
प्ले-ऑफसाठी पात्र संघ (कंसात गुण)
मुंबई सिटी (४६), हैदराबाद (३९), बंगळूर (३४), एटीके मोहन बागान (३१), केरळा ब्लास्टर्स (३१), ओडिशा (३०).
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.