Fans angry at BCCI: सोमवारी (8 मे) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी केएल राहुलच्या बदली खेळाडूची घोषणा केली आहे. बीसीसीआयने केएल राहुल ऐवजी यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनची निवड केली आहे. पण यानंतर क्रिकेट चाहत्यांकडून बीसीसीआयवर टीका होत आहे.
खरंतर ईशानला यापूर्वी संघात स्थान मिळाले नव्हते. पण केएल राहुल आयपीएल 2023 स्पर्धेत 1 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. तो या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व करत होता. त्याला मांडीची दुखापत झाली असून आता त्याला शस्त्रक्रियेलाही सामोरे जावे लागणार आहे.
त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिऍबिलेटेशन प्रक्रियेला तो सामोरे जाईल. त्याचमुळे त्याला कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याला मुकावे लागणार आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी ईशान किशनला यष्टीरक्षक फलंदाजीचा एक पर्याय म्हणून भारतीय संघात संधी मिळाली. ईशानव्यतिरिक्त भारतीय संघात यापूर्वीच केएस भरतची यष्टीरक्षक म्हणून निवड झालेली आहे.
याशिवाय बीसीसीआयने सोमवारी सूर्यकुमार यादव, मुकेश कुमार आणि ऋतुराज गायकवाड यांची 7 जून पासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध द ओव्हलवर होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाच्या राखीव खेळाडूंमध्ये निवड केली आहे.
मात्र, अनेक क्रिकेट चाहत्यांना बीसीसीआयच्या निवड समीतीने ईशान किशनला संधी देण्याचा निर्णय पटलेला नाही. त्यामुळे त्यांनी बीसीसीआयवर टीका केली आहे. तसेच अनेकांनी मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या सर्फराज खानला का संधी दिली गेली नाही, असा प्रश्नही विचारला आहे. त्याला राखीव खेळाडूंमध्येही निवडले गेले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काही चाहत्यांनी तर बीसीसीआयकडून भेदभाव केला जात असल्याचाही आरोप केला आहे. तसेच काहींनी वृद्धिमान साहा सारखा अनुभवी यष्टीरक्षक असतानाही ईशानची निवड झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
सर्फराज सध्या आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. पण त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. त्याने 4 सामन्यांमध्ये खेळताना 53 धावाच करता आल्या आहेत. पण असे असले तरी त्याची देशांतर्गत क्रिकेटमध्ये मात्र दमदार कामगिरी झालेली आहे.
सर्फराजने गेल्या तीन देशांतर्गत हंगामात चांगली कामगिरी केली आहे. त्याने आत्तापर्यंत 37 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 13 शतके आणि 9 अर्धशतकांसह 79.65 च्या शानदार सरासरीसह 3505 धावा केल्या. नाबाद 301 धावा ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.
त्याने 2022-23 रणजी ट्रॉफी हंगामातही 6 सामन्यांत 92.66 च्या सरासरीने 3 शतके आणि 1 अर्धशतकासह 556 धावा केल्या आहेत.
तसेच त्याने गेल्यावर्षीच्या रणजी हंगामात सर्वाधिक 982 धावा केल्या होत्या. त्यात त्याच्या 4 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश होता. तसेच त्याने इराणी ट्रॉफी 2022 सामन्यातही सर्वाधिक 138 धावा केल्या होत्या, तर त्याआधी झालेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेतही त्याने एका सामन्यात खेळताना 161 धावांची खेळी केलेली.
या कामगिरीनंतर त्याला भारताच्या कसोटी संघात संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या कसोटी मालिकेतही ही संधी मिळाली नाही. तसेच आता कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यातही संधी मिळालेली नाही. त्यामुळेच त्याला संधी न मिळाल्याने क्रिकेट चाहते बीसीसीआयवर टीका करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.