Umesh Yadav and Jaydev Unadkat Health Update: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोमवारी मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने 7 जूनपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी दुखापतग्रस्त केएल राहुलच्या जागेवर ईशान किशनची निवड केली आहे. याशिवाय उमेश यादव आणि जयदेव उनाडकट यांच्या फिटनेसबद्दल देखील माहिती दिली आहे.
केएल राहुलच्या मांडीला आयपीएल 2023 स्पर्धेत खेळताना दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याला मुकावे लागणार आहे. त्याला आता आगामी काळात शस्त्रक्रियेलाही सामोरे जावे लागणार आहे.
याशिवाय आयपीएल 2023 स्पर्धेत उमेश आणि उनाडकट हे देखील दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यांचाही कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात समावेश आहे.
आयपीएल 2023 स्पर्धेदरम्यान लखनऊ सुपर जायंट्स संघातील उनाडकटला नेट सरावादरम्यान खांद्याची दुखापत झाली आहे. सध्या तो त्याच्या या दुखापतीवर बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये काम करत आहे. त्यामुळे कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यामधील त्याच्या सहभागावर नंतर निर्णय घेण्यात येणार आहे.
याशिवाय उमेश यादवलाही आयपीएल 2023 स्पर्धेतील 36 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध खेळताना हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीला सामोरे जावे लागले होते. सध्या त्याच्यावर कोलकाताचे वैद्यकिय पथक उपचार करत आहे. तसेच त्याने हळू हळू गोलंदाजीला सुरुवात केली आहे. याशिवाय बीसीसीआयचे वैद्यकिय पथकही त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.
कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होणार आहे. तसेच 12 जून हा राखीव दिवस असणार आहे. हा सामना इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर रंगणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (यष्टीरक्षक).
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.