Bengaluru FC vs Kerala Blasters: इंडियन सुपर लीग 2022-23 हंगामात शुक्रवारी बंगळुरू एफसी आणि केरला ब्लास्टर्स यांच्यात झालेल्या प्ले ऑफच्या सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. बंगळुरूमधील श्री कांतिरावा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मध्येच केरला संघ एक निर्णय न पटल्याने मैदान सोडून गेले होते.
झाले असे की बंगळुरू आणि केरला संघांनी संपूर्ण सामन्यात एकमेकांना तगडी लढत दिली होती. या दोन्ही संघांना दोन्ही हाफमध्ये निर्धारित वेळेमध्ये एकमेकांविरुद्ध गोल करता आले नव्हते. पण सामन्याच्या भरपाई वेळेत सातव्या मिनिटाला नाट्यमय घटना घडल्या.
पंचांनी केरलाच्या बॉक्सच्या बाहेरुन बेंगळुरूला फाऊलवर फ्री किक दिली होती. त्यानंतर पंचांनी त्यांना लवकरात लवकर फ्री किक करण्यास सांगितले होते. फ्री किकच्यावेळी विरोधी संघाला फ्री किक मारणाऱ्या खेळाडू समोर वॉल तयार करता येते.
पण या सामन्यात असे काही झाले नाही आणि पंचांच्या विसलनंतर केरलाचा गोलकिपर संघातील इतर खेळाडूंशी चर्चा करत होता, त्याचवेळी बंगळुरूच्या सुनील छेत्रीने फ्री किकवर गोल केला. त्यामुळे वादाला सुरुवात झाली.
केरलाच्या संघाचे म्हणणे होते की त्यांचा गोलकिपर तयार नसतानाही फ्री किक करण्याची परवानगी कशी देण्यात आली. तर बंगळुरूच्या संघाचे म्हणणे होते की पंचांनी त्यांना परवानगी दिली होती. या घटनेनंतर केरलाचे खेळाडू पंचांशी वाद घालायला लागले. केरलाचे मॅनेजर इव्हान वुकोमानोविच यांनीही पंचांशी चर्चा केली. पण नंतर केरला संघाने मैदानातून निघून जाण्याचा निर्णय घेतला.
पंचांनी छेत्रीचा गोल योग्य असल्याचे सांगितले होते. त्यानंतर बंगळुरू संघ जवळपास अर्धातास मैदानावर वाट पाहात होता. अखेर मॅच ऑफिशियल्सने बंगळुरू एफसीला १-० अशा गोलफरकाने विजेता घोषित केले. त्यामुळे बंगळुरू एफसीने उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र आता या घटनेमुळे मोठा वाद समोर उभा राहिला आहे.
दरम्यान, सुनील छेत्रीने सांगितले आहे की त्यांने पंच आणि विरोधी संघाला विचारले होते की ते वॉल बनवणार आहेत का, त्यावर पंतांनी हो तू फ्री किक घे असे सांगितले होते. तेव्हा केरलाचे काही खेळाडूही तिथे होते आणि त्यांनी हे ऐकले होते.
पण अशी घटना इंडियन सुपर लीगमध्ये पहिल्यांदाच घडली आहे. दरम्यान, आता बंगळुरू एफसीला उपांत्य फेरीत मुंबई सिटीविरुद्ध होणार आहे. मुंबईने या हंगामातील लीग शिल्ड जिंकली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.