MS Dhoni will play IPL Final for 11th Time: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी (28 मे) अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात गतविजेते गुजरात टायटन्स आणि चार वेळचे विजेते चेन्नई सुपर किंग्स आमने-सामने असणार आहेत. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.
हा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्सचा 14 हंगामातील एकूण 10 वा अंतिम सामना आहे. पण चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीचा हा आयपीएलमधील 16 हंगामातील एकूण 11 वा अंतिम सामना असणार आहे.
दरम्यान, अनेकांना असा प्रश्न पडला असेल की धोनी पहिल्या आयपीएल हंगामापासून चेन्नईकडून खेळत असूनही संघाचा 10 वा आणि त्याचा 11 वा अंतिम सामना कसा.
पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे चेन्नई सुपर किंग्सवर 2016 आणि 2017 या दोन हंगामात बंदी घालण्यात आली होती. 2013 आयपीएल हंगामादरम्यान चेन्नई सुपर किंग्सच्या संघ मालकी असलेल्या कंपनीतील अधिकारी गुरुनाथ मय्यप्पन यांच्या सट्टेबाजीतील सहभागामुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
त्याचमुळे या दोन वर्षी रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि गुजरात लायन्स हे दोन नवे संघ आयपीएलमध्ये सहभागी झाले होते. यातील पुण्याच्या संघाकडून धोनी खेळला होता. त्यावेळी 2017 साली स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली पुण्याचा संघ आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहचला होता. त्यावेळी त्या संघात धोनीचाही समावेश होता.
त्यामुळे धोनीने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत पुण्याकडून एक आणि आता चेन्नईकडून दहाव्यांदा असे मिळून 11 अंतिम सामने खेळणार आहे.
चेन्नईने दोन वर्षांच्या बंदीनंतर 2018 साली पुन्हा आयपीएलमध्ये पुनरागमन केले होते. त्यावेळी पुन्हा धोनी चेन्नई संघात सामील झाला. त्यामुळे जरी चेन्नईसाठी यंदा 10वा अंतिम सामना असला, तरी धोनी यंदा 11 व्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे.
चेन्नईने 2023 पूर्वी 2008, 2010, 2011, 2012, 2013, 2015, 2018, 2019 आणि 2021 या वर्षीही आयपीएलचा अंतिम सामना खेळला आहे. यातील 2010, 2011, 2018 आणि 2021 यावर्षी विजेतेपदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे आता चेन्नई पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.