क्रिकेटच्या २५४ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात अनेक दिग्गज गोलंदाज झाले, अनेकदा हॅट्ट्रिकची नोंद झाली, पण जे आजवर कोणालाही जमले नाही ते न्यूझीलंडच्या एका मध्यमगती गोलंदाजाने करून दाखवले आहे. न्यूझीलंडमधील प्रतिष्ठित 'प्लंकेट शील्ड' या प्रथम श्रेणी स्पर्धेत ब्रेट रेंडेल या ३० वर्षीय गोलंदाजाने सलग पाच चेंडूंवर पाच गडी बाद करून जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात अशा प्रकारची कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.
विशेष म्हणजे ब्रेट रेंडेल हा यापूर्वी 'नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स' याच संघाकडून खेळायचा. मात्र, आता 'सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स'चे प्रतिनिधित्व करताना त्याने आपल्या जुन्याच संघाची दाणादाण उडवली. सेंट्रल डिस्ट्रिक्ट्सने पहिल्या डावात ३७३ धावांचा डोंगर उभा केला होता.
या धावसंख्येचा पाठलाग करायला उतरलेल्या नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्सच्या फलंदाजांना ब्रेटच्या वादळाचा सामना करणे अशक्य झाले. त्याने अवघ्या ८ षटकांच्या एका स्पेलमध्ये ७ बळी मिळवले, ज्यामध्ये त्या ऐतिहासिक पाच चेंडूंवरील पाच विकेट्सचा समावेश होता.
ब्रेटच्या या जादुई स्पेलची सुरुवात त्याच्या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर झाली, जिथे त्याने पहिली विकेट घेतली. त्यानंतर आपल्या पुढच्या षटकाच्या पहिल्या चार चेंडूंवर सलग चार गडी बाद करत त्याने 'दोन षटकांतील सलग पाच बळी' पूर्ण केले. या पाच विकेट्सपैकी तीन फलंदाज क्लीन बोल्ड झाले, तर दोन फलंदाजांना त्याने झेलबाद केले. ब्रेटच्या या धारदार गोलंदाजीमुळे नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्सची निम्मी टीम धावफलकावर अवघ्या ९ धावा असताना तंबूत परतली होती.
ब्रेट रेंडेलने या सामन्यात एकूण ११ षटके टाकली आणि २५ धावा देत ७ बळी आपल्या नावावर केले. त्याच्या या भेदक माऱ्यासमोर नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्सचा संपूर्ण डाव अवघ्या ८२ धावांत आटोपला. प्रतिस्पर्धी संघातील केवळ दोन फलंदाजांना दोन अंकी धावसंख्या गाठता आली. या ऐतिहासिक कामगिरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, क्रिकेट विश्वातील दिग्गज या ३० वर्षीय गोलंदाजाचे कौतुक करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.