पणजी : आमच्याप्रमाणे प्रतिस्पर्ध्यांनाही आक्रमक शैली आवडते. आक्रमणावर भर देत मोर्चेबांधणी करण्याचे नियोजन असल्याची माहिती एफसी गोवाचे प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी मुंबई सिटी एफसीविरुद्ध होणाऱ्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football) सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले.
एफसी गोवा आणि गतविजेते मुंबई सिटी यांच्यातील सामना सोमवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर (Jawaharlal Nehru Stadium) खेळला जाईल. 'उद्याचा सामना चांगला तुल्यबळ असेल. दोन्ही संघ आक्रमणावर भर देतात, त्यामुळे लोकांना सुंदर खेळ पाहायला मिळेल. अर्थातच, तीन गुण हेच आमचे लक्ष्य आहे,' असे फेरांडो यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले. दोन्ही संघ मातब्बर असून तांत्रिकदृष्ट्या दर्जेदार खेळाडू असल्याचे मतही 40 वर्षीय स्पॅनिश प्रशिक्षकाने व्यक्त केले.
परदेशी लवकर आल्याचा फायदा
संघातील परदेशी खेळाडू खूपच अगोदर दाखल झाले. त्यामुळे प्रशिक्षक या नात्याने प्रगतीवर भर देत संघबांधणी सोईस्कर ठरली. खेळाडूंनी खूप मेहनत घेतली आहे, त्यांनी खूपच प्रगती साधली असून आता सामन्यासाठी सज्ज आहोत. आक्रमण आणि बचाव या दृष्टिकोनातून संघाची मानसिकता स्पष्ट आहे, असे फेरांडो यांनी एफसी गोवाच्या मोसमपूर्व तयारीविषयी नमूद केले.
संघाचा आत्मविश्वास बळावलाय : बेदिया
फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवा संघाने मोसमपूर्व तयारीत कोलकाता येथे ड्युरँड कप स्पर्धा जिंकली. या यशाने संघाचा आत्मविश्वास बळावला असल्याचे मत कर्णधार स्पॅनिश खेळाडू एदू बेदिया याने व्यक्त केले. 'ड्युरँड कप स्पर्धा आमच्यासाठी अतिशय चांगली ठरली. सामन्याच्या वेळा, मैदान, इतर बाबतींत आम्हाला अडचणींचा सामना करावा लागला. आता आम्ही संघ या नात्याने मजबूत बनलो असून ड्युरँड कप जिंकल्यामुळे आमचा आत्मविश्वास उंचावल्याचे जाणीव झालीय,' असे आयएसएलमध्ये सलग पाचवा मोसम खेळणारा अनुभवी मध्यरक्षक म्हणाला. 'आमचा संघ उत्कृष्ट आहे. आम्हाला मोठी संधी आहे, तरीही आम्हाला काही बाबतीत सावध राहावे लागेल. प्रतिस्पर्ध्यांविषयी नव्हे, तर आमच्याविषयी विचार करतोय. सध्या फक्त पुढील सामन्याचेच लक्ष्य आहे.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.