इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर लगेचच जूनमध्ये टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा कॅरेबियन बेटे (वेस्ट इंडिज) आणि अमेरिकेत खेळवली जाईल. या स्पर्धांच्यादृष्टीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी काही खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
जय शाह यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला होता, त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की कोणतीही विदेशी गुंतवणूक आयपीएलमध्ये होऊ शकत नाही. तशा चर्चा चूकीच्या आहेत.
याशिवाय जय शाह यांनी सांगितले की ऋषभ पंत आगामी टी२० वर्ल्डकपमध्येही खेळू शकतो. पंतचा २०२२ वर्षाच्या अखेरीस कार अपघात झाला होता. त्या अपघातात झालेल्या दुखापतीतून पंत सावरला असून क्रिकेटमध्ये पुनरागमनाची तयारी करत आहे.
ते म्हणाले, 'तो चांगली फलंदाजी करत आहे, तो चांगले यष्टीरक्षणही करत आहे. आम्ही त्याला लवकरच तंदुरुस्त घोषित करू. तो जर टी20 वर्ल्डकप खेळू शकला, तर आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट असेल. तो आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. जर तो यष्टीरक्षण करू शकला, तर तो वर्ल्डकप खेळू शकतो. आता तो आयपीएलमध्ये कसे प्रदर्शन करतो, ते पाहू.'
पंत आयपीएल 2024 मधून क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. तो या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना दिसेल.
जय शाह यांनी स्पष्ट केले की मोहम्मद शमी टी20 वर्ल्डकप 2024 मधून बाहेर झाला आहे. शमी 2023 वनडे वर्ल्डकपनंतर क्रिकेट खेळलेला नाही. त्याला घोट्याची दुखापत झाली असून नुकतीच काही दिवसांपूर्वी त्याची शस्त्रक्रिया झाली आहे.
त्यामुळे तो आयपीएल आणि टी20 वर्ल्डकप खेळणार नाही. तो आता सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
याबद्दल जय शाह यांनी सांगितले की 'शमीवर शस्त्रक्रिया झाली आहे, तो भारतात परत आला आहे. बांगलादेशविरुद्ध मायदेशात होणाऱ्या मालिकेदरम्यान शमीच्या पुनरागमनाची शक्यता आहे.
याशिवाय इंग्लंडविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर मांडीच्या दुखापतीमुळे केएल राहुल भारतीय संघातून बाहेर झाला होता. दरम्यान, तो सध्या बंगळुरूमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) पुनरागमनाची तयारी करत आहे.
तो आयपीएल 2024 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व करताना दिसू शकतो. त्याच्याबद्दल जय शाह यांनी सांगितले की त्याला इंजेक्शन घेण्याची गरज होती. त्याने पुनरागमनाची तयारी सुरू केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.