Bangladesh Cricketer Shakib Al Hasan Set to Start career in politics:
आत्तापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी राजकाणात प्रवेश केला आहे. यामध्ये आता बांगलागेशचा कर्णधार शाकिब अल हसनचाही समावेश झाला आहे. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा झाल्यानंतल आता शाकिब राजकारणात प्रवेश करत आहे.
मीडियातील अनेक रिपोर्ट्सनुसार शाकिब जानेवारीमध्ये संसदीय निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले जात आहे. तो सध्या सत्तेत असलेल्या अवामी लीग या पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले जात आहे.
तो ढाकापासून 175 किमी अंतरावर असलेल्या आपल्या मुळ जिल्ह्यातील मागुरा-1 या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी त्याने तयारीलाही सुरुवात केली आहे.
दरम्यान, शाकिबने नुकतेच वर्ल्डकप 2023 मध्ये बांगलादेशचे नेतृत्व केले होते. पण बांगलादेशला फार काही खास कामगिरी करता आली नाही. बांगलादेशला केवळ २ सामनेच जिंकता आले. तसेच याच स्पर्धेदरम्यान शाकिबचे बोट फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे त्याला अखेरचा सामना खेळता आला नव्हता.
तथापि, न्यूझीलंडला आता 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबरदरम्यान बांगलादेशविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची. त्यानंतर बांगलादेश न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून तिथे त्यांना तीन वनडे आणि तीन टी20 सामने खेळायचे आहेत.
या मालिका 31 डिसेंबर रोजी संपणार आहेत. दरम्यान, या सामन्यांमध्ये शाकिब खेळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की शाकिबने यापूर्वीच स्पष्ट केले होते की न्यूझीलंड दौऱ्यानंतर तो वनडे संघाचे नेतृत्व सोडणार आहे.
शाकिब राजकारणात उतरणार असल्याने क्रिकेटमध्ये सक्रिय राहणार की निवृत्ती घेणार, याबाबत मात्र सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
यापूर्वी बांगलादेशचा माजी कर्णधार मश्रफे मुर्तझाने देखील क्रिकेटमध्ये सक्रिय असतानाच राजकारणात प्रवेश केला होता. तसेच तो एकाचवेळी क्रिकेट आणि राजकारण असे दोन्ही क्षेत्रात सक्रिय होता. त्यामुळे त्याच्याप्रमाणेच शाकिबही त्याच्या पावलावर पाऊल टाकणार का हे पाहावे लागणार आहे.
शाकिबने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 66 कसोटी सामने खेळले असून 5 शतके आणि 31 अर्धशतकांसह 4454 धावा केल्या आहेत. वनडेत 247 सामने त्याने खेळले असून 9 शतके आणि 56 अर्धशतकांसह 7570 धावा केल्या आहेत. शाकिबने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 117 सामन्यांमध्ये 2382 धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर त्याने कसोटीत 233 विकेट्स घेतल्या आहेत, तर वनडेत 317 विकेट्स घेतल्या आहेत, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 140 विकेट्स घेतल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.