India vs Australia | World Cup 2023 Final 
क्रीडा

World Cup 2023: भारताचं स्वप्न भंगलं! ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा 'वर्ल्ड चॅम्पियन'

World Cup 2023: वीस वर्षानंतर पुन्हा भंगलं भारताचं स्वप्न, ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा उंचावला वर्ल्डकप

Pranali Kodre

Australia Won ICC ODI Cricket World Cup 2023 by Beating India in the Final:

रविवारी (19 नोव्हेंबर) वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे विजेतेपद पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाने जिंकले. रविवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान भारतीय संघाला 6 विकेट्सने पराभूत केले.

ऑस्ट्रेलियाचा हा सहावा वर्ल्डकप विजय आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 साली ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकला आहे. विशेष म्हणजे 20 वर्षांपूर्वी म्हणजे 2003 साली ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारतालाच पराभूत करत विश्वविजय मिळवला होता.

अंतिम सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने 43 षटकात 4 विकेट्स गमावत पूर्ण केला. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने शतकी खेळी केली, तर मार्नस लॅब्युशेनने अर्धशतक केले.

भारताने दिलेल्या 241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि ट्रेविस हेड यांची जोडी उतरली होती. त्यांनी पहिल्याच षटकात 16 धावा काढत शानदार सुरुवातही केलेली. पण दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नरला 7 धावांवर माघारी पाठवले.

त्यानंतर काही वेळातच मिचेल मार्शचा अडथळा जसप्रीत बुमराहने 5 व्या षटकात दूर केला. यानंतर स्टिव्ह स्मिथ हेडची साथ देण्यासाठी आला होता. मात्र, त्याला बुमराहनेच सातव्या षटकात पायचीत पकडले. त्याची ही विकेट साशंक राहिली. मात्र त्याने रिव्ह्युची मागणी न केल्याने तो 4 धावांवर बाद झाला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाची अवस्था 3 बाद 47 धावा अशी होती.

त्यानंतर मात्र हेडने मार्नस लॅब्युशेनला साथीला घेतले. या दोघांनी चांगल्या चेंडूना सन्मान देत खराब चेंडूचा समाचार घेतला आणि ऑस्ट्रेलियाचा डाव पुढे नेला. एका बाजूने हेड आक्रमक खेळत असतानाच लॅब्युशेनने मात्र दुसरी बाजू संयमी खेळ करत भक्कमपणे सांभाळली होती.

या दोघांनीही भारतीय गोलंदाजांना यश मिळणार नाही, याची काळजी घेत फलंदाजी केली. त्यामुळे त्यांनी दीडशतकी भागिदारी रचली. या भागीदारीदरम्यान हेडने त्याचे शतकही पूर्ण केले, तर लॅब्युशेनने अर्धशतक पूर्ण केले.

मात्र विजयासाठी अवघे दोन धावा हव्या असताना हेडला मोहम्मद सिराजने बाद केले. हेडने 120 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकारांसह 137 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या ग्लेन मॅक्लवेलने उर्वरित दोन धावा करत ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजयावर शिक्कामोर्तब केले. लॅब्युशेन 110 चेंडूत 4 चौकारांसह 58 धावांवर नाबाद राहिला.

भारताकडून जसप्रीत बुमराहने 2 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. भारताकडून सलामीला शुभमन गिलसह कर्णधार रोहित शर्मा आला. पण गिलला 5 व्या षटकात मिचेल स्टार्कने गिलला 4 धावांवर बाद केले.

यानंतर विराट कोहलीने रोहितला चांगली साथ देताना अर्धशतकी भागीदारी केली. मात्र त्यांची जोडी जमलेली असतानाच 10 व्या षटकात रोहितला ग्लेन मॅक्सवेलने बाद केले. ट्रेविस हेडने मागे पळत येत त्याचा शानदार झेल घेतला. त्यामुळे रोहितला 31 चेंडूत 47 धावांची खेळी करून बाद व्हावे लागले.

यानंतर भारताची फलंदाजी मात्र अत्यंत संथ झाली. रोहितच्या पाठोपाठ पुढच्याच षटकात पॅट कमिन्सने श्रेयस अय्यरला 4 धावांवर बाद केले. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुलने डाव पुढे नेला, पण त्यांना मोठे फटके खेळता आले नाहीत.

29 व्या षटकात कमिन्सने विराटला त्रिफळाचीत करत भारताला मोठा धक्का दिला. विराटने 63 चेंडूत 4 चौकारांसह 54 धावा केल्या. रविंद्र जडेजाही 22 चेंडूत 9 धावा करून जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला.

अर्धशतक केलेल्या केएल राहुलचा अडथळा मिचेल स्टार्कने दूर केला. त्याने केएल राहुलला 66 धावांवर बाद केले. सूर्यकुमार यादव 18 धावांवर बाद झाला. त्यानंतर मात्र भारताची खालची फळीही कोलमडली. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात सर्वबाद 240 धावाच करता आल्या.

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच ग्लेन मॅक्सवेल आणि ऍडम झम्पाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT