ICC ODI Cricket World Cup 2023, Australia vs Pakistan, DRS Umpires Call Controversy:
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत शुक्रवारी दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान संघात धरमशाला येथे सामना झाला. शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 1 विकेटने विजय मिळवला. मात्र, या सामन्यात डिसिजन रिव्ह्यू सिस्टिम अर्थात डीआरएसच्या निर्णयांची बरीच चर्चा झाली. त्यावर आजी-माजी क्रिकेटपटूंनीही प्रतिक्रिया दिल्या.
या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 271 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना एडेन मार्करमने 91 धावांची खेळी केली होती. त्याच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिका 4 बाद 206 धावा अशा स्थितीत होते.
मात्र, त्यानंतर पाकिस्तानने शानदार पुनरागमन केले आणि त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची अवस्था 9 बाद 260 अशी झाली होती. यानंतर दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 11 धावांची गरज होती आणि पाकिस्तानला केवळ 1 विकेटची गरज होती.
अशा परिस्थितीत एक वादग्रस्त घटना घडली. 46 व्या षटकात हॅरिस रौफने टाकलेला चेंडू ताब्राईज शम्सीच्या पॅडला लागला. त्यामुळे पाकिस्तानने विकेटसाठी अपील केले. पण मैदानातील पंचांनी त्याला नाबाद दिले. त्यावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने डीआरएसची मागणी केली.
मात्र, डीआरएसमध्ये चेंडूचा टप्पा आणि दिशा योग्य दाखवली असली, तरी चेंडू स्टंपला अगदी हलका स्पर्श होऊ शकत असल्याचे दाखवल्याने अंपायर्स कॉल असा निर्णय देण्यात आला. त्याचमुळे मैदानावरील पंचांनी नाबाद दिले असल्याने शम्सीला जीवदान मिळाले. त्यानंतर केशव महाराजने 48 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला.
यानंतर हरभजन सिंगने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. त्याने लिहिले की 'पाकिस्तानला या सामन्यात वाईट अंपायरिंक आणि वाईट नियम महागात पडले. आयसीसीने हा नियम बदलला पाहिजे. जर चेंडू स्टंपला लागत असेल, तर मैदानावरील पंचांनी बाद किंवा नाबाद दिले असेल, तरी बाद द्यायला हवे. नाहीतर टेक्नोलॉजीचा उपयोग काय?'
मात्र, हरभजनच्या या पोस्टवर माजी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधाक ग्रॅमी स्मिथने प्रतिउत्तर देत रस्सी वॅन डर द्युसेनच्या विकेटचे उदाहरणही दिले. याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रस्सी वॅन डर द्युसेनची विकेटही वादग्रस्त ठरली होती, ज्यावर आयसीसीने चूक मान्य देखील केली आहे.
स्मिथने उत्तर दिले की 'भज्जी, तुला जे अंपायर्स कॉलबद्दल वाटते, तेच मलाही वाटते. पण रस्सी आणि दक्षिण आफ्रिका संघाला असेच वाटत असेल का?'
दरम्यान, झाले असे की 19 व्या षटकात उसमा मीर गोलंदाजी करत असताना त्याचा चेंडू रस्सीच्या पॅडला लागला. त्यावेळी चेंडूचा टप्पा योग्य होता. मात्र, इम्पॅक्ट अंपायर्स कॉल आला, तसेच आधी स्टंपला चेंडू लागत नसल्याचे दाखवण्यात आले आणि काही सेकंदातच पुन्हा दिसले की चेंडू स्टंपला लागत असून तोही अंपायर्स कॉल आहे. त्यामुळे रस्सीला 21 धावांवर माघारी जावे लागले.
या सामन्यानंतर आयसीसीच्या प्रवत्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आले की 'दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान रस्सी वॅन डर द्युसेनच्या पायचीत रिव्ह्यूवेळी अपूर्ण ग्राफिक दाखवण्यात आले होते. पण नंतर अखेरीस योग्य माहितीसह पूर्ण ग्राफिक दाखवण्यात आले.'
दरम्यान, या सर्व घटनांमुळे या सामन्यादरम्यान डीआरएस आणि अंपायर्स कॉल या बाबी बऱ्याच चर्चेत आल्या. त्यामुळे प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी अंपायर्स कॉलचा नियम पुन्हा स्पष्ट करूनही सांगितला.
त्यांनी सांगितल्या प्रमाणे, 'जेव्हा चेंडू पॅडला लागतो, तेव्हा चेंडू कुठे जाऊ शकतो,याचा अंदाज घेतला जातो, तो वास्तविक चेंडू नसतो. कारण त्याला मध्ये पॅडचा अडथळा आलेला असतो. जर 50 टक्क्याहून अधिक चेंडू स्टंपला लागत असल्याचा अंदाज असेल, तर तुम्हाला 100 टक्के या निर्णयाबाबत खात्री असते.'
'पण, जर हाच अंदाज 50 टक्क्याहून कमी असेल, तर तुम्ही खात्रीने सांगू शकत नाही की चेंडू स्टंपला लागेलच. त्याचमुळे पंचांच्या निर्णयाकडे पुन्हा जावे लागते. कारण तुमच्याकडे तो निर्णय बदलण्याची तितकी खात्री नसते. ही खूप चांगली आणि योग्य पद्धत आहे.'
'जसजसे कॅमेरा चांगले होत जातील आणि अंदाज आणखी अचूक होत जातील, तसे एक दिवस आपण तो दिवसही पाहू, जेव्हा चेंडूने स्टंपला अगदी हलका स्पर्श केल्याचा अंदाज जरी दाखवला, तरी तो वास्तविकच चेंडू स्टंपला आदळला असता.'
दरम्यान, या सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 46.4 षटकात सर्वबाद 270 धावा केल्या होत्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 271 धावांचे आव्हान 47.2 षटकात 9 विकेट्स गमावत पूर्ण केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.