David Warner found his baggy green cap:
ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सध्या सिडनीमध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याचा अखेरचा कसोटी सामना खेळत आहेत. याचदरम्यान या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळापूर्वी (5 जानेवारी) त्याने खुलासा केला की त्याची हरवलेली बॅगी ग्रीन कॅप सापडली आहे.
खरंतर चार दिवसांपूर्वी 2 जानेवारी रोजी त्याने सांगितले होते की मेलबर्न कसोटी संपल्यानंतर सिडनीला परत येताना त्याची त्याच्या पदार्पणावेळी मिळालेली ऑस्ट्रेलिया संघाची राष्ट्रीय कॅप (बॅगी ग्रीन) हरवली.
त्याने सांगितले होते की कॅप आणि त्याच्या मुलींनी दिलेल्या भेटवस्तू असलेली बॅग त्याच्या मोठ्या बॅगमधून गायब आहे. त्यामुळे ती बॅग परत करण्याबद्दल त्याने सोशल मीडियावरून अपील केले होते. यावेळी त्याने असेही सांगितले होते की ती बॅग परत केल्यावर तो कोणालाही त्रास देणार नाही.
अखेरच्या त्याच्या या अपीलनंतर चार दिवसांनी त्याच्या पदार्पणाची कॅप सिडनीतील संघाच्या हॉटेलमध्ये सापडली. दरम्यान तिथे ती कशी आली, याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र, वॉर्नरने त्याची कॅप मिळाल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे. त्याचबरोबर ती कॅप शोधण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचे त्याने आभारही मानले आहेत.
त्याने लिहिले की 'मला आनंद झाला आहे आणि मी चिंतामुक्त झालो आहे, माझी बॅगी ग्रीन मला सापडली आहे, जी खूप चांगली बातमी आहे. जे या शोधकार्यात सहभागी होते, त्या सर्वांचे आभार. मी खूप कृतज्ञ आहे. क्वांटास, मालवाहतूक कंपनी, हॉटेल्स आणि संघ व्यवस्थापन, सर्वांचे आभार.'
त्याचबरोबर तो व्हिडिओमध्ये म्हटला आहे की 'कोणत्याही क्रिकेटपटूला माहित असेल की त्यांची कॅप किती खास असते आणि मी आयुष्यबर तिला जपणार आहे.'
त्याच्या कॅपबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रवक्ते इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाले, 'ती बॅग संघाच्या हॉटेलमध्ये सापडली. त्यात सर्व सामान होते. मंगळवारपासून अनेकांच्या प्रयत्नांनंतर आणि अनेक ठिकणचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतरही त्या बॅगच्या हालचालींबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही.'
खरंतर कोणत्याही राष्ट्रीय संघाकडून पदार्पण करणाऱ्या खेळाडू सामन्यापूर्वी संघाची कॅप देण्यात येते. ही कॅप त्या खेळाडूसाठी प्रतिष्ठेची गोष्ट असते, त्यामुळे खेळाडू पदार्पणाची कॅप बऱ्याचदा सांभाळून ठेवतात.
सध्या सिडनीमध्ये 3 जानेवारीपासून सुरु झालेला ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान कसोटी सामना वॉर्नरचा अखेरचा कसोटी सामना आहे. त्याने यापूर्वीच जाहीर केले होते की तो पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेनंतर निवृत्ती घेणार आहे.
साल 2011 मध्ये कसोटी पदार्पण केलेल्या वॉर्नरने आत्तापर्यंत 111 कसोटी सामने खेळले असून 44.58 च्या सरासरीने 8695 धावा केल्या आहेत, ज्यात 26 शतके केली आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.